‘मधुरव’ आता रंगभूमीवर

लॉकडाऊन काळात मनोरंजन क्षेत्र पूर्णत बंद असताना ‘मधुरव’चे ऑनलाइन प्रयोग झाले. त्या उपक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ हा कार्यक्रम रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाला असून 3 डिसेंबरला या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिर येथे संपन्न होणार आहे.

मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी, गायन, नृत्य, नाटय़, अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण या कार्यक्रमात केली आहे. तथाकथित लेखक नसलेले, पण लिखाणातून व्यक्त होणारे तुमच्यातले (प्रेक्षकांमधले) काही निवडक लेखक यांना रंगमंचावर बोलावून त्यांच्या लिखाणाचे सादरीकरण करणे, त्यांच्याशी तसेच प्रेक्षागृहातल्या प्रेक्षकांशी संवाद, प्रश्नमंजुषा-भेटवस्तू असा परस्पर संवादाचा गंमतशीर प्रवाही असा हा कार्यक्रम आहे.

कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका अभिनेत्री मधुरा वेलणकर पार पाडणार आहे. कार्यक्रमाचे संशोधन, लेखन डॉ. समिरा गुजर जोशी यांचे असून नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नेपथ्य प्रदीप पाटील, पार्श्वसंगीत श्रीनाथ म्हात्रे, वेशभूषा श्वेता बापट, शीर्षकगीत संगीत हृषिकेश रानडे, पार्श्वगायन हृषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे यांचे आहे.