महाराष्ट्रात महाविकास आघाडी 40 पेक्षा जास्त जागा जिंकणारच! एकनाथ खडसे यांचा दावा

आगामी लोकसभा निवडणुकासाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. तसेच राज्यातही भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. जनमताचा कौल आणि सर्वेक्षणांचे अंदाज महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. राज्यात महाविकास आघाडी 40 पेक्षा जास्त जागा जिंकणारच असा दावा खडसे यांनी केला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर महायुतीला 45 जागा मिळतील असा दावा, महायुतीने केला आहे. त्यांनी तीन जागा जागा कोणासाठी सोडल्या आहेत माहिती नाही, असा टोलाही खडसे यांनी लगावला. मात्र, अलीकडच्या काळात आलेले सर्व्हे पाहिले तर महाविकास आघाडीला जास्त आणि महायुतीला कमी जागा मिळतील असा अंदाज आहे. महाविकास आघाडीला राज्यात 40 पेक्षा जास्त जागा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मिळतील ,असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

रावेर मतदारसंघाची लोकसभा जागा राष्ट्रवादीला मिळावी असा आमचा आग्रह आहे. रावेर मतदारसंघासाठी मी इच्छुक आहे. पक्षानेही मला या जागेसाठी लढण्यास सांगितले आहे. महाआघाडीकडून मी या जागेवर लढण्यास इच्छुक आहे. ही जागा आम्ही जिंकून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यात सर्व विरोधक आणि मी एकटा असे चित्र दिसून येत आहे. याचा अर्थ नाथाभाऊला विरोध करावा असे सत्ताधाऱ्यांना वाटते. नाथाभाऊला व्यक्तिगत विरोध करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. शेतकरी आत्महत्या, विकासाच्या दृष्टीने जे प्रश्न आहेत, त्यावर अधिक लक्ष घालावे, असा सल्लाही एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा नाही. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पुढील 15 दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या या जागांचा निर्णय होईल. जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकावी असा आमचा प्रयत्न आहे.आगामी वर्ष निवडणुकांचे आहे. त्यामुळे यात यश मिळावे असा आमचा संकल्प आहे असेही खडसे यांनी स्पष्ट केले.