
मुंबईत कोरोना आटोक्यात येत असताना पावसाळी आजारांनी मात्र डोके वर काढल्याने टेन्शन वाढले आहे. जुलैमध्ये आतापर्यंत मलेरियाचे 119 तर गॅस्ट्रोचे 176 रुग्ण आढळले आहेत. शिवाय डेंग्यूचेही 19 रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत संपूर्ण जून महिना कोरडा घालवणाऱया पावसाने जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. मात्र पावसाळय़ात पाणी साचून राहत असल्यामुळे किटकांचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय दूषित पाण्यामुळेही आजार होतात. यामध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात. तर किटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे आजार होतात.
पालिका सज्ज, दीड हजार बेडची व्यवस्था
पावसाळय़ात प्रदूषित पाण्यापासून होणारे आणि कीटकजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नियोजन केले आहे. सद्यस्थितीत दीड हजार बेडचे नियोजन केले असून गरज भासल्यास बेड वाढवण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.
कंट्रोल रूमच्या माध्यमातून पावसाळी आजारांचा आढावा दररोज घेण्यात येत असून कार्यवाही करण्यात येत आहे. याशिवाय पावसाळी आजार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
रुग्णसंख्या
- मलेरिया 119
- लेप्टो 5
- डेंग्यू 19
- गॅस्ट्रो 176
- हिपेटायटिस 23
- ‘एच 1 एन 1’ 3





























































