महिलेने साप मारायला बोलवलं, पती आणि मुलाने मारहाण करून गुप्तांग छाटलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

संकटात सापडलेल्या महिलेच्या मदतीला धावून जाणं एका माणसाला चांगलंच महागात पडलं आहे. त्या महिलेच्या नवऱ्याने आणि मुलाने त्याला मारहाण करून त्याचं गुप्तांग छाटलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मध्य प्रदेशच्या सीधी येथे घडली आहे. येथे राहणारा सुरेश (बदललेले नाव) हा त्याच्या शेतात रात्री 10 वाजता पाण्याची मोटर सुरू करायला गेला होता. तिथून परतत असताना त्याला वाटेत एक महिला भेटली. तिने त्याला तिच्या घरात साप घुसल्याचं सांगितलं.

त्या सापाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने तिची मदत करावी, अशी विनंती तिने केली. महिलेची मदत करण्यासाठी सुरेश तिच्या घरी गेला. घरात आल्यानंतर महिलेच्या पतीने आणि तिच्या दोन मुलांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली.

या अचानक हल्ल्यामुळे सुरेश काहीही करू शकला नाही. मारहाण करता करता महिलेच्या पतीने त्याचं गुप्तांग छाटलं आणि त्याला घराबाहेर काढलं. रक्तबंबाळ अवस्थेत तो मदत मागत राहिला. त्याच्या कुटुंबीयांपर्यंत या घटनेची माहिती कळताच त्यानी त्याला रुग्णालयात दाखल केलं.

त्याच्या गुप्तांगाच्या जोडणीची शस्त्रक्रिया शक्य नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र, आता रक्तस्राव थांबल्याने त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्यावर इलाज करण्याऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सुरेशला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.