
आयटी क्षेत्रापासून ते छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये इ-मेलशिवाय पान हालत नाही. मात्र, अशावेळी खबरदारी जर घेतली नाही, तर हॅकरकडून तुमच्या मेलचा दुरुपयोग करुन बनावट मेल पाठविण्याची शक्यता असते. त्यामुळे नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते. असाच एक अनुभव लष्कर परिसरातील मोटार शोरुममध्ये कार्यरत असलेल्या संचालकाला आला आहे.
मागील अनेक वर्षांपासून शोरुममध्ये कामाला असलेल्या व्यक्तीचा इ-मेल हॅक झाला. हॅकरने संचालकाच्या मेल आयडीवरुन संबंधित मोटार शोरुमच्या मॅनेजरला राजीनामा दिल्याचा मेल पाठविला. त्यामुळे मोटार शोरुम कंपनीने संबंधित व्यक्तीला नोकरीवरुन काढून टाकले. शोरूममधून तुम्ही नोकरी सोडल्याचे सांगितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी किरणपाल सिंग अहलुवालिया (वय 46, रा. औंध) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणपाल लष्कर परिसरातील एका नामांकित मोटार शोरूममध्ये नोकरीस होते. मागील अनेक वर्षांपासून ते शोरुममध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचा मेल आयडी हॅक झाला. हॅकरने किरणपाल यांच्या मेल आयडीवरुन त्यांच्या नावाने कंपनीला नोकरीचा राजीनामा पाठविला. कंपनीनेही किरणपाल यांचा राजीनाम्याचा मेल समजून त्यांचा राजीनामा मंजूर केला. राजीनामा मंजूर झाल्यानंतर संबंधित मोटार शोरुम प्रशासनाने किरणपालला नोकरी सोडल्याची शहानिशा केली. त्यावेळी किरणपालने कंपनीला राजीनाम्याचा मेल केलाच नसल्याचे सांगितले. हॅकरने त्यांचा मेल हॅक करून किरणपाल यांचा कंपनीला राजीनामा पाठविल्याचे उघड झाले.































































