युवासेनेच्या मागणीनंतर एमसीए सत्र-2 आणि एटीकेटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठाने मास्टर डिग्री इन कॉम्प्युटर ऑप्लिकेशनच्या (एमसीए) सत्र-2 आणि पहिल्या सत्राच्या एटीकेटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 17 जुलैपासून सुरू होणार होत्या, मात्र यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. सकाळ सत्रात एटीकेटीची तर दुपार सत्रात सत्र-2 ची परीक्षा होणार होती. दुसऱया सत्राची परीक्षा देणाऱया अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात एटीकेटी लागली आहे. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही परीक्षा कशा देणार या विवंचनेत विद्यार्थी सापडले होते, पण आता विद्यापीठाने दोन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार एमसीए पहिल्या सत्राची एटीकेटीची परीक्षा 19 ते 22 जुलैदरम्यान होणार आहे, तर दुसरी सत्र परीक्षा 25 जुलै ते 3 ऑगस्ट यादरम्यान होणार आहे. युवासेना माजी सिनेट सदस्य शीतल देवरुखकर-शेठ यांच्याद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे एमसीए परीक्षाप्रकरणी तक्रार आली होती. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने अभ्यासाचे नियोजन कसे करावे अशी विद्यार्थ्यांची तक्रार होती. याप्रकरणी माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रसाद करंडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विद्यार्थीहिताचे निर्णय घेऊन वेळापत्रक बदलण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आता वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.