जालन्यात मतिमंद बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न, संतप्त जमावाने माथेफिरूला बेदम चोपले

जालना शहरातील जुना जालना भागातील कसबा परिसरात असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिरात एक 70 वर्षीय वृद्ध महिला सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आरतीच्या कार्यक्रमासाठी आपल्या 8 वर्षाच्या मतिमंद नातीला घेऊन आली होती. मंदिरात आरती सुरू असतानाच बाहेर खेळत असलेल्या या मतिमंद मुलीला एका 50 वर्षीय माथेफिरू इसमाने उचलून मंदिराच्या पाठीमागे नेले होते. त्या मुलीला उचलून नेताना एका महिलेने पाहिल्याने तिने तातडीने ही माहिती त्या मुलीच्या आजीला दिली. त्यावेळी आजीने तात्काळ मंदिराच्या पाठीमागे जाऊन पाहिले असता, तो इसम आपल्या नातीवर बलात्कार करतांना दिसले. त्या वृद्धेने आरडाओरडा करीत त्या इसमाला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, तरीही तो बाजूला होत नव्हता.

मंदिरात आरतीला आलेल्या जमावाच्या हा प्रकार लक्षात येताच जमावाने त्या इसमाला बेदम चोप देत पोलिसांना माहिती दिला. हा मुलीवर बलात्कार करणार्‍या इसमाचे नाव त्र्यंबक रामकीसन दहिवाळ असे असून, पीडित मुलीच्या काकांच्या दुकानात नेहमी येणे-जाणे होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिनबापू सांगळे, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांच्यासह पिंक मोबाईल पथकाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकार्‍यांनी जमावाला शांत करीत आरोपीची जमावाच्या तावडीतून सुटका करून, त्याला ताब्यात घेतले.

जमावाच्या मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.