MI Junior Inter School Cricket Tournament – मलिंगाने दिला युवा खेळाडूंना कानमंत्र

अंजुमन-इ-इस्लाम अल्लाना इंग्लिश स्कूल (सीएसएमटी) आणि आर. आर. एज्युकेशन ट्रस्ट, मुलुंड संघाने एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत 14 आणि 16 वर्षांखालील मुले गटाचे जेतेपद पटकावले. शारदाश्रम विद्यामंदिर संघाने 15 वर्षांखालील मुली गटात बाजी मारली. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला. तेव्हा त्याने खेळाडूंशी संवाद साधला.

मलिंगाने यावेळी शालेय क्रिकेट खेळतानाचे दिवस आणि क्रिकेटपटू म्हणून त्याच्या विकासात घेतलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची आठवण करून दिली. तो म्हणाला की, “तुमच्या जीवनाचा आणि करियरचा पाया रचत असल्याने शालेय क्रिकेट सर्वात महत्त्वाचे आहे. हे असे वय आहे जिथे आपण सर्वात जास्त लवकर शिकत. आजकाल, खूप संधी आहेत. परंतु एमआय ज्युनियरसारखी स्पर्धा युवा क्रिकेटपटूंसाठी त्यांचे कौशल्य विकसित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. या मुलांचा वेगाने विकास कसा होईल याची मी आतुरतेने वाट पाहत आहे,” असे मलिंगा म्हणाला.

एमआय ज्युनियरमध्ये मुलींची श्रेणी तसेच महिला पंच आणि स्कोअर असल्याने मलिंगा विशेषतः प्रभावित झाला. त्याने महिलांच्या समावेशाचे स्वागत करताना म्हटले की, “सर्व तरुण मुलींना इतक्या लहान वयात अधिक खेळण्याची आणि उच्च दर्जाची स्पर्धा अनुभवण्याची उत्तम संधी आहे. हा उपक्रम कायम सुरू ठेवण्याची एमआयला विनंती करेन. कारण क्रिकेट खेळाची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. शिवाय तरुण क्रिकेटपटूंना चमकण्याची संधी देखील देतो.”