
मिझोरामच्या काही मंत्र्यांना हिंदी समजत नाही तर काहींना इंग्रजी कळत नाही. मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी स्वतः ही वस्तुस्थिती मांडत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना बदलण्याची मागणी केली आहे. सध्याच्या मुख्य सचिवांना मिझो भाषेमधील कारभार समजत नाही आणि आमच्या मंत्र्यांना हिंदी व इंग्रजी येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
माझ्या मंत्रीमंडळामधील एकाही व्यक्तीला हिंदी भाषा कळत नाही. त्यामुळे मुख्य सचिव हा मिझो भाषेचे ज्ञान असणारा असावा, अशी मागणी झोरामथांगा यांनी केली आहे. मिझोरामची निर्मिती झाल्यापासून केंद्र सरकारने कधीच मिझो भाषेची जाण नसणाऱया व्यक्तीला राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त केलेले नाही. केंद्रात यूपीए सरकार असो किंवा एनडीए सरकार असे कधीच घडले नव्हते, असे म्हणणे त्यांनी मांडले आहे.






























































