
‘‘माझ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणारे नेते बोलघेवडे नेते असून, अगोदर त्यांनी त्यांच्या कामाचा हिशेब द्यावा,’’ अशी टीका आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळून केली.
नगर येथील आंदोलन संपल्यानंतर लंके हे मोहटादेवीच्या दर्शनासाठी आले होते. नगर-पाथर्डी मार्गावर असलेल्या अनेक गावांत लंके यांचे ढोल- ताशा लावून जोरदार स्वागत करण्यात आले, तर पाथर्डी येथे त्यांची मिरवणूकेसुद्धा काढण्यात आली. यावेळी शिवशंकर राजळे, रफिक शेख, राजेंद्र दौंड, बंडू बोरुडे, चाँद मणियार, सीताराम बोरुडे, नासीर शेख, योगेश रासने, अतिश निऱहाळी, राजेंद्र शेवाळे, बाळासाहेब जिरेसाळ, सचिन नागापुरे, राजेंद्र शेवाळे, मधुकर मानूरकर, संजय दराडे उपस्थित होते.
लंके म्हणाले, कल्याण-निर्मल महामार्गाचे काम लवकर पूर्णत्वास जाऊ दे, असे साकडे आपण मोहटादेवीला घातले आहे. या मार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मी विधानसभेत आवाज उठविला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे शासन होते. महामार्गाच्या कामांसंदर्भात सर्वांनीच हात टेकल्याने मी या विषयाचा पाठपुरावा केला. सध्या जे माझ्याविरोधात बोलतात, ते कोणती कामे करतात, हे जनतेला कळू द्या. मी कोणत्याही विषयाचे पूर्वीपासून राजकारण करीत नाही. माझा इतिहास विरोधकांनी तपासून पाहावा. लोक अडचणीत असतात तेव्हा मी त्यांच्यासाठी धावून जात असल्याचे ते शेवटी म्हणाले.
































































