खासदार कलाबेन डेलकर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघाच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मीताई ठाकरे यांनी कलाबेन यांचे औक्षण केले. या भेटीच्यावेळी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, शिवसेना खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते.

दादरा-नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत भगवा फडकला. शिवसेनेच्या कलाबेन मोहन डेलकर यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. शिवसेनेने या ऐतिहासिक विजयाने महाराष्ट्राबाहेर प्रथमच सीमोल्लंघन केले. कलाबेन यांनी भाजपच्या महेश गावीत यांचा 51 हजार 269 मतांनी पराभव केला. कलाबेन यांना 1 लाख 18 हजार 35 तर गावीत यांना 66 हजार 766 मते मिळाली. या विजयाबद्दल शिवसेनेचे देशभरात अभिनंदन होत असून ‘हा हुकूमशाहीवर मिळवलेला विजय आहे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यामुळे दादरा-नगर हवेलीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत 76 टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते.