
सुट्टीवर गेलेल्या मित्राला फोन करणं सहकाऱ्याला चांगलेच महागात पडू शकते. त्याच्या एका चुकीमुळे त्याला एक लाखांचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. मुंबईच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनोखा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले आहे.
मुंबईतील स्टार्टअप कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा बदल केला आहे. कर्मचारी वर्षभरातून जेव्हा आठवड्याभराच्या सुट्टीवर जातात तेव्हा हे कर्मचारी कामापासून दूर असतील शिवाय सिस्टमही अनप्लग करतील. जर कोणी सुट्टीदरम्यान संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना एक लाखांचा भुर्दंड भरावा लागणार आहे. ड्रीम 11 फॅन्टेसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या मुंबईच्या ड्रीम स्पोर्ट्स कंपनीने एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, कर्मचाऱ्यांना वर्षभरातून एक आठवडाभराची सुट्टी घेणे आवश्यक आहे. कंपनीचे सह संस्थापक आणि सीईओ हर्ष जैन यांनी सांगितले की, कर्मचाऱ्याच्या सुट्टीच्या दिवसात सहकर्मचाऱ्याने फोन केल्यास 1 लाखाचा भुर्दंड भरावा लागणार.
पुढे त्यांनी सांगितले की, वर्षभरातून एका आठवड्यासाठी त्या कर्मचाऱ्याला सिस्टमच्या बाहेर ठेवावे लागते. त्या दरम्यान त्या व्यक्तीला फोन किंवा ईमेल येणार नाही. पुढे त्यांनी सांगितले की, त्यामुळे सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्याला आठवड्याभरासाठी पूर्ण आराम मिळतो. त्यावर हेही कळणार की ते कोणावर अवलंबून आहेत की नाहीत ते. आतापर्यंत ड्रीम स्पोर्ट्सद्वारे याबाबत पालन करण्यात आले आहे आणि ते प्रभावीही ठरलं आहे. 2008 मध्ये सुरु झालेल्या कंपनीचे सह-संस्थापक आणि सीओओ भावित शेठ यांनी सांगितले की, सुट्टीच्या दिवसात कामाचे ओझे असेल तर सुट्टीची मजा घेता येत नाही. त्यामुळे सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्याला सुट्टीचा आनंद घेता यावा, विश्रांती घेता यावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.





























































