पुणे एक्प्रेस वेवर 9 दिवस ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खंडाळा बोगद्यातील सैल झालेले दगड तसेच महामार्गावरील कोसळण्याच्या परिस्थितीत असणाऱया दरडी हटवण्याचे काम पुणे प्रादेशिक विभागाच्या महामार्ग सुरक्षा पथकाने हाती घेतले आहे. 12 ते 20 मार्च या 9 दिवसांच्या कालावधीत हे काम करण्यात येणार असून त्यासाठी दररोज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत दर तासाला 15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ब्लॉकच्या वेळा जाहीर केल्या आहेत. ब्लॉकच्या काळात एक्स्प्रेस-वेवर वाहनांची वर्दळ वाढली तर मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱया प्रवाशांना ब्लॉकच्या वेळा टाळून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असे घेतले जातील ब्लॉक

1 सकाळी 10 ते 10.15
2 सकाळी 11 ते 11.15
3 दुपारी 12 ते 12.15
4 दुपारी 2 ते 2.15
5 दुपारी 3 ते 3.15

वीकेंडच्या काळात एक्स्प्रेस-वेवर वाहतुकीचा प्रचंड ताण येतो. त्यामुळे शुक्रवार, 15 मार्च दुपारी सव्वातीन वाजल्यापासून 18 मार्च सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला राहील.

पावसाळ्यापूर्वी एक्स्प्रेस-वेवरील जास्तीत जास्त धोकादायक दरडी हटवण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याआधीही दरडी हटवण्यासाठी एक्सप्रेस-वेवर ब्लॉक घेण्यात आले होते.