अमली पदार्थाचा गुन्हा गंभीर, पण प्रशासनाला गांभीर्य नाही; हायकोर्टाने उपटले कान, आरोपीला मंजूर केला जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमली पदार्थ बाळगल्याचा गुन्हा गंभीर आहे. पण याचे गांभीर्य तपास यंत्रणेला नाही. तपासात नियमांचे पालन योग्य प्रकारे होत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला.

न्या. सारंग कोतवाल व न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठाने हा संताप व्यक्त करत एका आरोपीला 50 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. 2023मध्ये या आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक झाली. या आरोपीकडे अमली पदार्थ सापडले होते. याचा गुन्हा नोंदवण्यात आला. तपासापासून न्यायालयात हजर करण्यापर्यंत अनेक नियमांचे उल्लंघन झाले आहे. तेव्हा जामीन मंजूर करावा, अशी विनंती आरोपीने केली होती.

ही विनंती न्यायालयाने मान्य केली. आरोपीने केलेल्या दाव्यात तथ्य आहे. अधिकचे कोकेन या आरोपीकडे सापडले होते. कोकेन स्वतःकडे ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. तपास यंत्रणेला याचे गांभीर्य नसल्याने या तपासात दोष राहिला, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.

मूलभूत अधिकारावर गदा

फेब्रुवारी 2024 ते एप्रिल 2025 या काळात सुनावणी न्यायालय व कारागृहात या आरोपीबाबत काहीही समन्वय नव्हता. या कालावधीत आरोपीला न्यायालयात हजर केले गेले नाही. याचे समाधानकारक उत्तर तपास यंत्रणेने दिलेले नाही. तपास यंत्रणेच्या या कृतीमुळे आरोपीला जामीन मंजूर करावा लागत आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

70 तारखांपैकी 5 वेळाच हजेरी

आरोपीला अटक केल्यापासून कोर्टात 70 तारखा झाल्या. यांपैकी 5 सुनावणीलाच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. चार वेळा व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे हजर करण्याचा प्रयत्न झाला. लिंक ओपन झाली नाही, असा युक्तिवाद तपास यंत्रणेने केला. तपास यंत्रणेच्या या निष्काळजीपणामुळे खटला पारदर्शक होत नाही, असे न्यायालयाने सुनावले.