
तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर समर्थकांच्या लवाजम्यासह जंगी मिरवणूक काढणाऱया कुख्यात गजानन मारणेची मुंबई हायकोर्टाने आज वरातच काढली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आम्ही आरोपींना पॅरोलवर सोडतोय आणि तुरुंगातून सुटल्यावर तुम्ही निर्धोकपणे जंगी मिरवणुका काढता असे झापत हायकोर्टाने आरोपी गजा मारणेला खडसावले एवढेच नव्हे तर आरोपीची क्रेझ पाहता तो काय स्वत: ला रॉबिनहूड समजतो का असा सवालही हायकोर्टाने मारणेच्या वकिलांना विचारला.
विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगणाऱया गजा मारणेची तळोजा तुरुंगातून 15 जानेवारी रोजी सुटका झाली. सुटल्यानंतर मारणे याच्या समर्थकांनी सुमारे 300 गाडय़ांमधून मुंबई-पुणे महामार्गावरून जंगी मिरवणूक काढली. याची दखल घेत पोलिसांनी मारणेला पुन्हा ताब्यात घेतले. हे गुन्हे रद्द करण्यासाठी आरोपी मारणे याने अॅड. आबाद पोंडा यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली.
उशीर का केला?
गजानन मारणेविरोधात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई का केली? घटनेच्या तीन दिवसांनी पोलिसांनी एफआयआर दाखल का केला? त्याच दिवशी एफआयआर दाखल करण्यास काय हरकत होती, अशा प्रश्नांची सरबत्तीच हायकोर्टाने पोलिसांवर केली.
































































