
सामना प्रतिनिधी, नवी मुंबई
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कोपरखैरणेतील मुस्लिम बांधवांना हक्काचे कब्रस्तान मिळणार आहे. सध्या असलेल्या कब्रस्तानची 30 लाख रुपये खर्चून पुनर्रचना केली जाणार असून त्यात सर्व प्रकारच्या आवश्यक सोयी मिळणार आहेत. या कब्रस्तानच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचा विरोध डावलून मंजूर झाला. कब्रस्तानला विरोध केल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीचे मुस्लिमप्रेम बेगडी असल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेच्या सदस्यांनी मात्र गनिमी कावा वापरून याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
कोपरखैरणे येथील सेक्टर 12 ई मध्ये असलेल्या सुन्नी कोकणी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दफनविधीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या भागातील मुस्लिम बांधवांनी शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास हे वास्तव आणून दिल्यानंतर त्यांनी आपला 25 लाख रुपयांचा निधी या कब्रस्तानसाठी दिला. महापालिका प्रशासनाने आणखी पाच लाख रुपये दिले.
एक सदस्य तटस्थ
हा प्रस्ताव आज स्थायी समितीत आला असता, या कामाचे श्रेय शिवसेनेला जाऊ नये यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीने प्रस्तावाला कडाडून विरोध केला. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे फक्त पाचच नगरसेवक सभागृहात होते.राष्ट्रवादीच्या दिव्या गायकवाड या तटस्थ राहिल्या. त्याच संधीचा फायदा घेऊन शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर, नामदेव भगत, शिवराम पाटील, रंगनाथ औटी, दीपाली सकपाळ, भाजपचे सुनील पाटील यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सभापती सुरेश कुलकर्णी यांना हा प्रस्ताव नाइलाजास्तव मंजूर करावा लागला.





























































