
सध्या ऑनलाईन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या हातातही पुस्तकांपेक्षा जास्त वेळ मोबाईलच असतो. त्यांच्यात वाचनाची आवड रूजावी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेने ‘डोनेट अ बुक’ ही चळवळ हाती घेतली. लोकसहभागातून अवघ्या काही दिवसात 41 हजार पुस्तके भेट मिळाल्याने जिल्ह्यातील 2439 शाळांमध्ये वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शेकडो विद्यार्थी या पुस्तक वाचनाचा आनंद घेवू लागले आहेत. अगदी बांधावर बसून निसर्गाच्या सानिध्यातही वाचन सोहळे सुरू असल्याचे आशादायी चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत जिल्ह्यात 3266 शाळा आहेत. यामध्ये 1 लाख 99 हजार 587 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी येथील वाचनालयांमध्ये 5 लाख 72 हजार 733 पुस्तके उपलब्ध होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने पुस्तक वाचनापासून दूर राहू नये म्हणून ‘डोनेट अ बुक’ उपक्रम सुरू करण्यात आला. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकसहभागातून पुस्तके मिळाल्याने 22 ऑगस्ट रोजी निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द शाळेने पहिले वाचनालय सुरू केले. त्यानंतर बघता बघता उदंड प्रतिसाद मिळत गेल्याने प्राथमिक शाळांमध्ये 2195, ग्रामपंचायत कार्यालयात 29, समाजमंदिरांमध्ये 156 आणि इतर ठिकाणी 95 वाचनालये सुरू झाली आहेत. याचा लाभ 1 लाख 68 हजार मुले घेत आहेत. या वाचनालयांमध्ये दररोज नोंदी ठेवण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश म्हसकर यांनी दिली. याबद्दल शिक्षक आणि ग्रामस्थांचे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी कौतुक केले आहे.
पुस्तके दान करा
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी, त्यासाठी गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय हवेत म्हणून जिल्हा परिषदेने ‘डोनेट अ बुक’ उपक्रम सुरू केला. ग्रामीण भागातील मुलांना याचा लाभ मिळून ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यास मदत होणार आहे. या उपक्रमासाठी पुस्तकांचे दान करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी केले आहे.




























































