राष्ट्रीय टेनिस स्पर्धा (14 वर्षांखालील) – प्रणवला दुहेरी मुकुटाची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एआयटीए एमएसएलटीए 14 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात तामीळनाडूच्या प्रणव रेथीन आरएस याने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. दुहेरीत मुलांच्या गटात प्रणव रेथीन व साम्प्रीत शर्मा यांनी आणि मुलींच्या गटात कनुमुरी इकराजू व ऐश्वर्या जाधव यांनी विजेतेपद पटकावले.

जी. ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व वुडहाऊस जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात तामीळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएसने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत हरयाणाच्या तिसऱया मानांकित तेजस आहुजाचा 6-4,2-6,6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला.

दुसऱया मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागी याने तामीळनाडूच्या पाचव्या मानांकित महालिंगम खांदवेलचा 6-4, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. याच गटात दुहेरीत अंतिम फेरीत प्रणव रेथीन आरएस याने साम्प्रीत शर्माच्या साथीत तेजस आहुजा व सिद्धांत शर्मा या जोडीचा 4-6, 6-1, 10-8 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

मुलींच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या आस्मी आडकर हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत कर्नाटकाच्या टी. साई जान्हवीचा 6-1, 6-4 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. ओडिशाच्या बिगरमानांकीत सोहिनी मोहंती हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सातव्या मानांकित कर्नाटकाच्या संजना देवीनेनीचा 7-5,6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुहेरीत अंतिम फेरीत कनूमुरी इकराजू व ऐश्वर्या जाधव यांनी मानसी सिंग व सोहिनी मोहंती यांचा 5-7, 6-3, 10-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्पर्धा संचालक मनोज वैद्य, एआयटीए सुपरवायझर सोनल वैद्य आणि वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.