
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडत असतानाच त्यांनी केलेल्या पक्षातील अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानं देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शरद पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळाच्या ठिकाणीच ठिय्या दिला आणि जोपर्यंत निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत जागा सोडणार नाही अशी आग्रही भूमिका घेतली. तसेच अनेकांनी पक्षाच्या विविध पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्ची माहिती सर्वांना दिली.
‘पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पवार साहेबांनी केलेल्या घोषणाची कुणालाच कल्पना नव्हती. तो त्यांचा निर्णय होता. मात्र नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या नंतर त्यांनी राजीनाम्यासंदर्भात विचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. तसेच जोपर्यंत कार्यकर्ते आपापल्या घरी परतत नाहीत तोपर्यंत आपण त्याच निर्णयावर ठाम राहीन’, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.




























































