होणार तुम्ही ‘एप्रिल फूल’, करणार ‘दिशाभूल’ कारण सोबतीला आहे ‘कमळाचं फूल’, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

एकेकाळी भारतीय जनता पक्षाने ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवले, ज्यांच्याविरोधात आंदोलन केले, तक्रारी दाखल केल्या तेच नेते आज भाजपमध्ये घेतले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीमध्येही हा मुद्दा चांगलाच गाजतोय. विरोधकांनी यावरून रान उठवलेले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘भ्रष्टाचाऱ्यांसाठीही आमचे दरवाजे सदैव उघडे’, असल्याने म्हटल्याने भाजपची गोची झाली आहे. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने 1 एप्रिल अर्थात एप्रिल फूलचा मुहूर्त साधून एक भन्नाट पत्र लिहिले आहे.

वाचा हे पत्र जसंचं तसं…

ओळखलंत मला… मी घोटाळ्याची फाईल ! आज माझा दिवस म्हणून खास तुमच्याशी गप्पा मारायला आली आहे. अहो असं काय करता… आज ‘एप्रिल फूल’ नाही का…? गेली 10 वर्ष कमळाच्या साथीने मी तुम्हा जनतेलाच तर एप्रिल फूल बनवत आली आहे. विरोधी पक्षातील कुठलाही व्यक्ती सत्ताधारी सरकारविरोधात जास्त बोलू लागला की, त्याला बरोबर हेरलं जातं. मग अगोदर कमळाची माणसं ही या विरोधातल्या माणसाशी वाटाघाटी करायला लागतात… आमिष दाखवतात… जर ते करुनही विरोधक झुकत नसला की, मग माझी निर्मिती होते. होय, ‘मी घोटाळ्याची फाईल….

कमळाच्या स्वार्थासाठी तुम्हा जनतेचा ‘एप्रिल फूल’ बनवण्याकरिता मी सज्ज होते. अनेक आरोपांच्या कागदांनी मला बनवलं जातं. मग मी कमळाच्या कार्यालयातल्या एका कपाटात जाते. तिथून माझ्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी ऑर्डर दिली की, मी बाहेर येऊन सक्रीय होऊन जाते. मग आरोपांनुसार ठरवलं जातं की, मी नेमक्या कुठल्या कार्यालयात जायचं… ईडी, आयटी, सीबीआय की एसीबी… मग मी एखाद्या तपास यंत्रणेच्या कार्यालयातल्या चौकशी अधिकाऱ्याच्या टेबलावर जाते. त्यानंतर विरोधातल्या व्यक्तीला समन्स पाठवून इथं कार्यालयात बोलावलं जातं… या विरोधी व्यक्तीची चौकशी केली जाते. कधी कधी मी थेट या विरोधकांच्या घरांवर, कार्यालयांवर धाडी टाकण्यासही जाते. त्यांची मुलं, सूना, नातवंडे या सगळ्यांना मी त्रास देते… हे करण्यात मला एक वेगळाच आनंद वाटतो.

Lok Sabha Election 2024 – वंचितकडून तिकीट, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसाची पक्षातून हकालपट्टी

या दरम्यान माध्यमांमधून तर माझी भलतीच चर्चा होते. तुम्हा जनतेचंही लक्ष आकर्षित होतं. या देशात कमळ काहीतरी चांगलं करतंय असं तुम्हाला वाटू लागतं. घोटाळेबाजांवर कारवाई होईल या विचारांनी एक नागरिक म्हणून तुमच्या आशा पल्लवित होतात. लोकशाही जपली जात आहे, असं तुम्हाला वाटू लागतं… पण ज्याच्यावर आरोप केला तोच व्यक्ती त्याचा पक्ष सोडून कमळवाल्यांच्या पक्षात सहभागी होतो… मग काय त्याचे सगळे आरोप आपोआप धुतले जाऊन संपूर्ण चौकशी आणि कारवाई अचानक थांबून जाते. आणि तुमचा ‘एप्रिल फूल’ होऊन जातो… एखाद्या घोटाळेबाजावर कारवाई होईल असं तुम्हाला वाटत असतानाच अचानक त्याचा भाजप प्रवेश होऊन त्याच्यावरचे आरोप धुतले जातात तेव्हा तुमची झालेली फसगत, तुमचा मी केलेला ‘एप्रिल फूल’ पाहून मला लय भारी वाटतं! मग काय मी पुन्हा थेट तपास यंत्रणांकडून कमळवाल्यांच्या गारेगार कार्यालयातील एका कपाटात विश्रांती करत बसते. 2014 पूर्वी हे असं काहीच माझ्या वाट्याला आलं नव्हतं… पण ही अनोखी सफर माझ्या आयुष्यात घडली ती कमळामुळेच… गेल्या 10 वर्षात कमळाची प्रत्येक पाकळी माझा वापर करून देशवासियांना दररोज एप्रिल फूल बनवत आहे, यामुळे माझा नावलौकिक उत्तरोत्तर वाढतच आहे. यापुढेही ‘घोटाळ्याची फाईल’ या नात्याने कमळाच्या साथीने तुम्हा देशवासियांना कायम ‘एप्रिल फूल’ बनवत राहण्याची मी तुम्हाला गॅरंटी देते.

आपली, घोटाळ्याची फाईल

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)