महायुतीत एकमेकांच्या फाईल्स अडवल्या जातात; रोहित पवार यांचा हल्लाबोल

राज्यात सध्या अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात वाक्युद्ध सुरू आहे. अजित पवार यांनी बहीणीविरोधात सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले ही चूक झाली, असे मान्य केले होते. त्यावर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर दिल्लीचा दबाव होता, हा निर्णय त्यांचा असूच शकत नाही,असे मत व्यक्त करत अजित पवार यांना टोला लगावला होता. आता अजित पवार यांचे महायुतीतील महत्त्व कमी झाल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. महायुतीत एकमोकांच्या फाईल्स अडवल्या जातात, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजितदादांनी सही केलेल्या फाईलवर देवेंद्र फडणवीस सही करणार,अशी प्रथा पुर्वी नव्हती. अजितदादांनी सही केल्यानंतर फाईल दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी जाते. अजितदादांच्या सहीनंतर फाईलवर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची सही लागते. म्हणजे अजितदादांनंतर फाईलवर दोन सह्या होतात. त्यामुळे एकमेकांच्या फाईल अडवून आपली कामे कशी पुढे रेटली जातील, असा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येतो. अशा प्रकारांमुळे महायुतीत एकमेकांच्या फाईल्स अडवल्या जातात, हे दिसून येत असल्याचे रोहित पवार म्हणाले.