राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाम; आम्हाला पवारच हवेत, अध्यक्षपदाचा निर्णय शुक्रवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे, मात्र त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत आहे. अध्यक्षपदी शरद पवारच हवेत अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जी समिती नियुक्त करण्यात आली आहे, त्या समितीची बैठक 5 मे रोजी घेण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे. शुक्रवारी होणाऱया बैठकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभेतील मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. पुणे, बुलढाणा, धाराशीव, चंद्रपूर आदी ठिकाणी पदाधिकाऱयांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही, असे विधान करत शरद पवार यांनी आठवडय़ाभरापूर्वी पक्ष संघटनेतील बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतर पवार यांनी स्वतःच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. पदाधिकाऱयांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेऊन मनधरणी केली.

दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, 1 मे 1960 रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे माझं 1 मे सोबत वेगळं नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे.

पुण्यात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची बॅनरबाजी
पुण्यात यासाठीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘साहेब, पदाधिकारी निवृत्त होत असतात, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे. आज महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. साहेब, कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी…’ अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसकडून लावण्यात आले आहेत.

पक्षाध्यक्ष पदात रस नाही – प्रफुल्ल पटेल
‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद हे गौरवशाली आहे. माझ्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अध्यक्ष बनण्यात मला अजिबात रस नाही. मी ती जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर घेणार का, असा प्रश्न त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला होता.

बैठक नव्हती… तरीही जयंत पाटील यांच्या गैरहजेरीची चर्चा
शरद पवार हे नेहमीप्रमाणेच आज सकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले होते. तिथे राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि पदाधिकारीही पोहोचले होते. प्रत्येक जण आपापल्या परीने पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पुण्यातील साखर भवनात एका बैठकीत व्यस्त होते, मात्र त्याची खातरजमा न करताच माध्यमांवर जयंत पाटील यांच्या गैरहजेरीची बातमी झळकली आणि चर्चांना ऊत आला. त्याबद्दल पाटील यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी मुंबईतील बैठकीचे आपल्याला निमंत्रण नव्हते असे सांगितले. शरद पवार यांनी स्वतः बैठकीतून जयंत पाटील यांना पह्न केल्याचेही वृत्त झळकले. त्यावरूनही पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या. मात्र मुंबईत आज कोणतीही बैठक झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. त्यानंतर चर्चांवर पडदा पडला. आपण अन्य एका बैठकीसाठी मुंबईबाहेर होतो आणि माध्यमांनी विचारल्यास उसळे मुंबईतील बैठकीचे निमंत्रण नसल्याचे सांगितले असे स्वतः जयंत पाटील यांनीही स्पष्ट केले. शरद पवार यांचा निर्णय आपल्याला मान्य नसून त्यांनीच अध्यक्षपदी राहावे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

शरद पवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचे काम पाहायला हवे अन्यथा राज्याचं काम अजित पवारांनी सांभाळावं आणि दिल्लीतील काम सुप्रिया सुळेंनी पाहावे, असे माझे स्वतःचे मत आहे.
– छगन भुजबळ

मी वरिष्ठांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते असे मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरीत्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला, पण आपण 6 मेची बैठक 5 मे रोजीच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.
– शरद पवार