आता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत! रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

इंग्लंडमध्ये होणारी विश्वचषक स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी उरलाय. त्यामुळे आता हिंदुस्थानी संघात कुठलाही बदल होणार नाही. सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी संघात निवड झालेल्या खेळाडूंचाच विश्वचषकासाठी संघात विचार केला जाईल असे संकेत ‘टीम इंडिया’चे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना रवी शास्त्री यांनी हे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, ‘फलंदाजीतली क्रमवारी, गोलंदाजीतले बदल या सर्व गोष्टींची वेळ आता संपली आहे. सध्या आम्ही निवडक 15 खेळाडूंची भट्टी जमविण्याला प्राधान्य देत आहोत. हेच खेळाडू विश्वचषकासाठी देशाचे प्रतिनिधित्व करतील. सराक आणि प्रयोगाचा कालावधी आता उलटून गेला आहे,’ असे रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले.

शास्त्री म्हणाले, विश्वचषक स्पर्धेसाठी जेमतेम आठ महिन्यांचा कालावधी उरला आहे. विश्वचषकाआधी ‘टीम इंडिया’ला अंदाजे 13 सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे या सामन्यांमध्ये चांगला खेळ करून दुखापती होणार नाहीत याकडे आमचे अधिक  लक्ष असणार आहे. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर ऐनवेळी दुसरा पर्याय शोधताना संघाची बसविलेली घडी विस्कटली जाते.

फलंदाजीत अजून सुधारणेची गरज : विराट

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर फलंदाजीतील सुधारणेवर आमचा अधिक भर असणार आहे. कारण सध्या ‘टीम इंडिया’कडे गोलंदाजीचा सर्वोत्तम ताफा आहे, मात्र फलंदाजांनी आपली जबाबदारी समजून चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. अष्टपैलू खेळाडूंनी तळाला फलंदीजीत योगदान दिल्यास हिंदुस्थानी संघ कुठलाही सामना किंवा मालिका जिंकू शकेल. इंग्लंड दौर्‍यावर लॉर्डस् कसोटी सोडली तर हिंदुस्थानी फलंदाज फारशी समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. सांघिक फलंदाजी करू न शकल्याने इंग्लंड दौर्‍यावर कसोटी मालिकेत हार पत्करावी लागली, मात्र ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी आम्ही सज्ज आहोत. इंग्लंड दौर्‍यात झालेल्या चुका या दौर्‍यात होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. संघातील खेळाडूंच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. खेळाडू कसे तंदुरुस्त राहतील याची काळजी घेण्यात आली आहे, असेही कोहलीने सांगितले. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर हिंदुस्थानी संघ तीन टी-20, चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.