
>> महेश उपदेव
वकिली करताना सामाजिक भान जपणारे, न्यायमूर्ती म्हणून काम करताना रामशास्त्री बाणा जपणारे आणि न्यायमूर्तीपदावरून निवृत्त झाल्यावरही अखेरच्या क्षणापर्यंत समाजजीवनात सक्रिय असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातच परिचित होते. ज्येष्ठ सर्वोदयी नेते आचार्य दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र असलेले न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी जन्म जरी रायपूरला झाला तरी नागपूर हीच आपली कर्मभूमी मानली होती. त्यांचे शालेय शिक्षण काही वर्ध्यात तर काही नागपुरात झाले. बालपण हे सर्वोदयी नेत्याच्या घरात झाल्यामुळे ‘राजकीय आणि सामाजिक नेत्यांची मुले कायम निवडुंगासारखी वाढतात’ असे ते कायम सांगायचे. मात्र निवडुंगासारख्या वाढलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे काटे कमी तर जिव्हाळाच जास्त असे स्वरूप सर्वांनाच अनुभवायला मिळाले.
उच्च न्यायालयाचे वकील आणि त्याचबरोबर समाजजीवनातले एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. साहजिकच समाजातील प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहज संचार असायचा. 1972 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले. आपल्या न्यायालयीन कारकीर्दीत त्यांनी आपल्या रामशास्त्री बाण्याची चुणूक अनेकदा दाखवली. विशेषतः 1975 ते 77 या काळात देशात आणीबाणी लागली असताना आणि सरकारविरुद्ध ब्र काढण्याचीही कोणाची हिंमत होत नसताना मिसाबंदीबाबत सरकारच्या विरोधात निर्णय देण्याची त्यांनी हिंमत दाखवली होती. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर दिलेला त्यांचा निर्णय फार गाजला होता. या निर्णयामुळे ठोस पुरावे नसलेल्या स्थानबद्ध आंदोलकांना तत्कालीन सरकारला सोडावे लागले होते. सर्वसाधारणपणे न्यायमूर्ती या पदावर पोहोचलेली व्यक्ती ही समाजजीवनापासून काहीशी अलिप्तच राहते. इच्छा असो वा नसो, पण न्यायासनावर बसलेल्या व्यक्तीला अशी अलिप्तता जपणे हे गरजेचे असते. मात्र आपल्या न्यायमूर्तीपदाच्या कारकीर्दीत न्या. धर्माधिकारींनी ही अलिप्तता झुगारून देत समाजजीवनातही स्वतःला सक्रिय ठेवले. अर्थात, अशा पद्धतीने सक्रिय असताना कोणताही वाद निर्माण न होऊ देता आपले सामाजिक दायित्व अखेरपर्यंत जपले.
न्यायमूर्तीपदावरून ते 1989मध्ये निवृत्त झाले. त्यानंतरही सामाजिक जीवनात न्यायदानाची भूमिका त्यांनी कायम ठेवली होती. त्यामुळेच राज्य शासनाने नेमलेल्या दारूबंदी संदर्भातल्या समितीचा अहवाल त्यांनी अनेकांचा विरोध पत्करून दारूबंदीच्या बाजूने दिला होता. न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असताना आणि नसतानाही आपल्या फर्ड्या वक्तृत्वाने मैदान गाजवणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. आपल्या निवृत्तीनंतरच्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी प्रचलित विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. त्यांची व्याख्याने खर्या अर्थाने ‘अक्षर वाङ्मय’ म्हणून गाजली. त्याचबरोबर विविध विषयांवर विपुल लेखनही त्यांनी केले होते. त्यांना विधायक राजकारणाविषयी कळकळ होती, परंतु राजकारणातील भ्रष्ट वृत्तीवर ते तेवढीच सडेतोड टीका करायचे. अनेक सामाजिक संस्थांचे सारथ्य करताना त्या संस्थांच्या कार्याला एक नवी दिशा देऊन त्या अधिकाधिक लोकाभिमुख आणि प्रगत कशा होतील याकडे त्यांनी कायम लक्ष दिले. संपन्न हिंदुस्थानचे स्वप्न पाहणारा व त्या स्वप्नपूर्तीसाठी आयुष्य झिजवणारे श्रेष्ठ कृतिशील विचारवंत म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने गांधीवादी विचारवंतांच्या पिढीतील आणखी एक दुवा निखळला आहे म्हटल्यास वावगे ठरू नये.































































