
नवनाथ शिंदे
सोशल मीडियाचा अतिवापर धोकादायक ठरत असून अनोळखी मैत्री, डेटींग अॅप, टिंडर, स्नॅपचॅटवरील आभासी ओळख तरूणाईसह जेष्ठांच्या अंगलट येत आहे. शारिरीक जवळिक साधण्याच्या हेतूने अनोखळी तरूणींसोबत मैत्री वाढवली जात आहे. मात्र, आर्थिक लुटमारीसाठी तरूणींच्या नावाखाली सायबर चोरटे सोशल मीडियाचा वापर करून लुटमार करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ऑनलाईन डेटींग अॅपसह इतर अॅपचा वापर करताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे .
पुण्यात शिक्षण नोकरी, व्यवसाय, कामधंदा करण्यासाठी नागरिकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कुटूंबापासून दूर, मित्र- मैत्रिणी व पार्ट्यांमुळे अनेकांना मोकळीक मिळते. त्याशिवाय सोशल मीडियाचा वाढता वापर व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिंडर, स्नॅपचॅट, ऑनलाईन डेटींग अॅपमध्ये गुंतवून ठेवत आहे. त्यामाध्यमातून अनोळखी तरूणींसोबत होणारी मैत्री आणि शारिरीक जवळीक साधण्यासाठी केलेला प्रयत्न जीवावर बेतण्याच्या घटनांमुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. डेटींग साईटवरून झालेल्या ओळखीतून दोन तरूणांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, त्यांच्यात वादावादी झाल्याने एकाने पीएचडी करणाऱ्या तरूणाचा खून केल्याची घटना मागील वर्षी सुसगावामध्ये घडली होती. त्याशिवाय डेटिंग अॅपद्वारे ओळखीतून अनेक तरूणांसह जेष्ठांनी लाखो रूपये गमाविल्याचे निष्पन्न झाले आहे.
डेटींग अॅपवर ओळख झाल्यानंतर तरूणींकडून विश्वास संपादित केला जातो. त्यानंतर व्हिडिओ, फोटोज वापरून ब्लॅकमेल करणे, धमकी देणे, खंडणी मागण्याचे प्रकारही वाढले आहेत. अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. ऑनलाईन डेटींग अॅपद्वारे जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्यासंदर्भातील तक्रारींचा वाढता आलेख चिंताजनक ठरला आहे. पुण्यात डेटींग अॅपद्वारे 2019 मध्ये 105 जणांची फसवणूक झाल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे करण्यात आली आहे.
त्याशिवाय 2020 मध्ये 86 तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तर 2021 आणि 2022 मध्येही डेटींग अॅपवरील अनोळखी मैत्रीतून फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये परप्रांतीय टोळ्या कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेषतः दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता येथील टोळ्यांकडून फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांना सावधनता बाळगणे गरजेचे आहे. विशेषतः विविध अॅपद्वारे तरूणांना मैत्रीची भुरळ पाडली जात असल्याचे काही घटनांवरून उघड झाले आहे. विश्वास संपादित करून आर्थिंक फसवणूक, लुटमारही केली जात आहे. त्यामुळे तरूणाईने आपली खासगी माहिती, कौटुंबिक माहिती कोणालाही शेअर न करता सोशल मीडिया सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे सायबर पोलिसांचे आवाहन
– ऑनलाईन अनोळखी मैत्रीपासून दूर राहा
– टिंडर आणि स्नॅपचॅट अॅपचा वापर काळजीपुर्वक करा
– अनोळखी तरूणींच्या अमिषाला भुरळू नका
– सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाळा
– फेक प्रोफाईलपासून दूर रहा
– व्हेरीफाईड अॅपशिवाय इतर कोणालाही माहिती देउ नका
– सोशल मीडियाचा अतिवापर टाळा
मैत्रीला भुलले अन 17 लाखाला डुबले
डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री संपर्क साधणे एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल 17 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक वारजे भागात राहायला असून ते बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये श्रेया नावाच्या तरुणीने ज्येष्ठ नागरिकाला मोबाइल संपर्क साधला होता. तिने मैत्रीचे आमिष दाखवून तक्रारदाराला छायाचित्रे पाठविली. तिच्या मागणीनुसार तक्रारदाराने सुरुवातीला तरूणीला ऑनलाइन पद्धतीने 3 हजार रुपये पाठविले. तिने दिलेल्या बँक खात्यात तक्रारदाराने वेळोेवेळी पैसे पाठविले. संबंधिताने तक्रारादाराला आमिष दाखवून वेळोवेळी 17 लाख 10 हजार रुपये उकळले आहेत.






























































