अकरावी ऑनलाइनसाठी यंदा तीनच प्रवेशफेऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी चार नियमित प्रवेशफेऱ्या राबवूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेऱयांचे राऊंड घेणाऱया शिक्षण विभागाने सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या नियमित प्रवेशफेऱ्यांनाच कात्री लावली आहे. यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या चार ऐवजी तीनच प्रवेशफेऱया होणार आहेत. तसेच बायफोकल शाखेत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांना प्रवेशाची एकच संधी मिळणार असून बायफोकलची दोन ऐवजी एकच प्रवेशफेरी होणार आहे.

2019-20 च्या अकरावी ऑनलाइन प्रवेशात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी प्रवेशप्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यापुढे ऑनलाइन प्रवेशाच्या केवळ तीनच फेऱया होणार आहेत. प्रत्येक फेरीचा कालावधी हा एक आठवडय़ाचा असणार आहे. नियमित फेऱयांचे प्रवेश झाल्यानंतर 1 विशेष फेरी व त्यानंतर प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य फेऱया होणार आहेत.

दहावीचे बरेच विद्यार्थी आयटीआय, पॉलिटेक्निकसोबतच अकरावी ऑनलाइनचा अर्जदेखील भरतात. अकरावीचा ऑनलाइन अर्ज तसेच आयटीआय – पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला आहे, अशांची नावे ऑनलाइन प्रक्रियेत पुनः पुन्हा येतात. त्यांना ऑनलाइन अर्ज मागे घेण्याचा पर्याय यंदा उपलब्ध असेल.

प्रवेश रद्द केल्यास विशेष फेरीत पुन्हा संधी
ऑनलाइन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचा प्रवेश रद्द करता येईल पण पुन्हा ऑनलाइन प्रवेश घ्यायचा असल्यास अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीमध्येच सहभागी होता येणार आहे. तसेच प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनादेखील विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना कल आणि अभिक्षमता चाचणीचा निकाल 16 ते 22 मार्च या कालावधीत मिळणार आहे. विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा कालावधीतच परीक्षा केंद्रावर निकाल देण्यात येईल. दहावीचा पेपर संपल्यानंतर शाळा प्रतिनिधींनी संबंधित परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना कलचाचणी अहवालाचे वाटप करावे, तसेच विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना अहवालाचे वाटप झाल्यावर शाळांनी कार्यवाहीचा अहवाल शिक्षण मंडळास सादर करावा, असे आवाहनही खंडागळे यांनी केले आहे.