हिंडेनबर्ग अहवालावरून संसदेत पुन्हा प्रचंड गदारोळ; कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंडेनबर्ग कंपनीने अदानी समूहाबद्दल प्रसिद्ध केलेल्या अहवालाचे पडसाद आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दोन्ही सभागृहांत या मुद्दय़ावरून विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लावून धरल्याने दोन्ही सभागृहांत झालेल्या प्रचंड गदारोळामुळे संसदेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प झाले. दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

अर्थसंकल्पाच्या चौथ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत अदानीचा मुद्दा गाजला. त्यामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा, अशी मागणी विरोधकांनी दोन्ही सभागृहांत केली, मात्र सरकारकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राज्यसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने कामकाज दुपारी 2.30 पर्यंत व त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेतही याच मुद्दय़ावरून गदारोळ झाला.