लोकांना हवे वास्तववादी AI, वापरकर्त्यांची नवी पसंती संशोधनातून समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सध्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. घर ते आॅफिस आपण प्रत्येक ठिकाणी AI चा वापर सर्रास करत आहोत. AI आधारित चॅटबॉट्स अधिक मानवी आणि भावनाप्रधान बनवण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमुळे आजचे एआय सहाय्यक पूर्वीपेक्षा अधिक नैसर्गिक संवाद साधू लागले आहेत. मात्र, अलीकडेच समोर आलेल्या एका संशोधनाने एआयच्या संवादशैलीबाबत एक वेगळे चित्र उभे केले आहे. या अभ्यासानुसार, वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी अतिशय उत्साहाने किंवा अनावश्यक मैत्रीपूर्णपणे प्रतिसाद देणारे चॅटबॉट्स विशेष आवडत नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या स्वभावाशी जुळणाऱ्या पद्धतीने संवाद साधणाऱ्या एआय प्रणालींना लोक अधिक पसंती देतात.

संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये एक समान बाब दिसून आली. शांत आणि मितभाषी स्वभावाच्या लोकांना थेट, स्पष्ट आणि संयत उत्तर देणारे चॅटबॉट्स अधिक आवडले. तर अधिक संवादप्रिय आणि उत्साही व्यक्तींनी ऊर्जावान शैलीतील संवादाला पसंती दिली. यावरून एआयच्या यशामध्ये त्याची बुद्धिमत्ता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्याची संवादशैलीही महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाले. तज्ज्ञांच्या मते, एखादा चॅटबॉट गरजेपेक्षा जास्त भावनिक किंवा मैत्रीपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो कृत्रिम वाटू शकतो. अशा वेळी वापरकर्त्यांना संवाद नैसर्गिक वाटत नाही आणि त्यांचा त्या प्रणालीवरील विश्वासही कमी होऊ शकतो. असे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.

आज ग्राहक सेवा, शिक्षण, कार्यालयीन कामकाज, आरोग्यविषयक ॲप्स आणि स्मार्टफोन सहाय्यकांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे एआय वापरकर्त्यांशी कोणत्या पद्धतीने संवाद साधतो, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरत आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, एआयच्या विकासाचा पुढील टप्पा केवळ अधिक मैत्रीपूर्ण बनण्याचा नसून वापरकर्त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार स्वतःला जुळवून घेण्याचा असेल. त्यामुळे भविष्यातील एआय प्रणाली अधिक वैयक्तिकृत, विश्वासार्ह आणि प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे.