आम्हीच का, बाकी अधिकारी नाहीत का? बंदोबस्ताच्या अतिताणाने पोलीस वैतागले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारचा मनमानी, भ्रष्ट कारभार तसेच अन्यायी धोरणांविरोधात वारंवार जनक्षोभ उफाळून येत आहे. याचदरम्यान नीट पेपरफुटीवरुन आंदोलने झाली. आता एसआयआरमधील अनियमिततेच्या गंभीर मुद्दय़ावर सर्व विरोधी पक्षांसह कॉक्रोच जनता पार्टी, विविध संघटनांकडून मुंबईत आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांमुळे मुंबई पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढला आहे. यासाठी वरिष्ठ दबावातून आपल्या विश्वासातून अधिकाऱयांना तैनात करीत असल्यामुळे ‘सारखं सारखं आम्हालाच का? बाकी अधिकारी नाहीत का,’ अशी खदखद अनेक पोलीस अधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत.

मुंबईत नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात जोरदार आंदोलने झाली. आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व त्यांना पाठीशी घालणाऱया सत्ताधाऱयांविरोधात आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांवर ‘बंदोबस्त डय़ुटी’चा ताण वाढला आहे. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ अधिकारी आपल्या विश्वासातील अधिकाऱयांनाच तैनात करीत आहेत. हे अधिकारी उन्हातान्हात सातत्याने रस्त्यावर डय़ुटी बजावून प्रचंड वैतागले आहेत. वरिष्ठ आपल्यावर विश्वास दाखवून डय़ुटी देत असले तरी सततच्या अशा बंदोबस्ताचा मानसिक त्रास असह्य होत आहे. हा भार आमच्यावरच का, एकीकडे उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यात बंदोबस्त करून प्रचंड हैराण व्हायला होत आहे, अक्षरशः नोकरीचाच कंटाळा आला आहे, अशी खदखद काही अधिकाऱयांनी नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखवली.

लागोपाठ आंदोलने

नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी व विविध संघटनांनी दिल्लीप्रमाणे मुंबईत आंदोलने केली. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जेन झींनी जोरदार आंदोलने केली. आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनता सातत्याने रस्त्यावर उतरत आहे. याचदरम्यान आरक्षण व अन्य मागण्या तसेच सरकारच्या जुलमी कारभाराविरोधात आंदोलनांचे शस्त्र उपसले जात आहे. प्रत्येक आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा लागत आहे.

पोलीस ठाण्यांतील कामाचाही ताण

ऊठसूट आम्हालाच बंदोबस्ताला लावले जात आहे. सातत्याने आम्हालाच रस्त्यावर बंदोबस्त करायला पाठवले जात असल्याने पोलीस ठाण्यातील कामे खोळंबतात. ती कामे वेळेत नाही झाली तरी वरिष्ठांकडून आम्हालाच ओरडा पडणार. पोलीस दलात अन्य पोलीस अधिकारी नाहीत का? इतर अधिकाऱयांना बंदोबस्ताची डय़ुटी का दिली जात नाही? असे प्रश्न अधिकाऱयांमधून उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठांनी या दुहेरी त्रासाची दखल घ्यायला हवी, असेही त्यांचे म्हणणे आहे.