भुदरगड तालुक्यातील दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड , 7 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुदरगड, आजरा, राधानगरी, कागल तालुक्याला गावठी दारू जिथून पुरवली जाते, त्या जंगल परिसरातील देवकेवाडी ता. भुदरगड येथे गावठी दारू अड्ड्यांवर भुदरगड पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत दारू बनवणारे रसायन, प्लास्टिक टाक्या, मोटारसायकली असा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात अवैध दारू विक्री व गावठी दारू अड्डे यावर धाडी टाकण्याचे सत्र भुदरगड पोलिसांनी अवलंबले आहे. परवा नांदोली व शेळोलो येथे 40 हजाराची गोवा बनावटीची दारू पकडल्यानंतर भुदरगड पोलिसांनी गावठी दारू अड्ड्याकडे मोर्चा वळवला आहे. आज दुपारी पोलिसांनी देवकेवाडी येथे जंगल परिसरात असणाऱ्या तीन दारू अड्ड्यावर धाड टाकली. हे दारू अड्डे दीपक बाजीराव पोर्लेकर (35), रा. देवकेवाडी, विजय एकनाथ येरम, रा. देवकेवाडी व अन्य साथीदार चालवत होते.

या धाडीत 11 हजार 100 लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन, जप्त करून नष्ट करण्यात आले. प्लास्टिक टाक्या, घागरी, दोन मोटारसायकली असा एकूण 6,97,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आणि संबंधितांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, सतीश मयेकर व इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला होता.