परीक्षण – चकचकीत शहरातला भेसूर कोपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • योगिनी राऊळ

खासगी वाहिन्यांचं पेव फुटण्यापूर्वी आपण सगळेच दूरदर्शनचे प्रेक्षक होतो. दूरदर्शनवर दोन कार्यक्रमांच्या मध्ये आवाहन येत असे, ‘आपण यांना पाहिलंत का?’ हरवलेल्या व्यक्ती बहुतेक सज्ञान, प्रौढ असत. क्वचित मानसिक संतुलन बिघडलेल्या, घरचा पत्ता विसरलेल्या वृध्द व्यक्तींचा पह्टो दिसे. अशीच पत्रपं आपल्याला रेल्वे वा बसस्टॉपवर अजूनही दिसतात. ‘घरी निघून ये, तुला कोणी ओरडणार नाही…’ असा मजकूर एखाद्या पत्रकावर असतो. पण यातलं कोणीच सहा वर्षांचं, आठ वर्षांचं, बारा वर्षांचं नसतं. असतात त्या सगळ्या पंधरा-सोळा वयापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती. म्हणजे लहान मुलं हरवतच नाहीत आपल्याकडे?

खरी परिस्थिती अशी आहे की, गावखेडय़ात वा छोटय़ा शहरांच्या गरीब वस्तीत मुलं हरवण्याचं प्रमाण प्रचंड आहे, पण तक्रारीसाठी पोलिसांकडे जाण्याचं प्रमाण फार कमी. एकतर शिक्षणाचा अभाव, त्यात गरिबी आणि वर वर्दीची भीती. मग ही हरवलेली मुलं जातात कुठे?

हे असं काही काही तपशिलात जाऊन शोधावंसं वाटलं, याचं निमित्त ठरलं शैलेंद्र पोळ या लेखकाचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक ‘पोऱया.’ शैलेंद्र बलवंत पोळ महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेले राजपत्रित अधिकारी. 1991 साली त्यांची लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनात नियुक्ती झाली. माथाडी बोर्डाचे चेअरमन, सेक्युरिटी बोर्डाचे सचिव, सातारा, औरंगाबाद विभागाचे उपायुक्त, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त अशी विविध पदे त्यांनी आतापर्यंत भूषविली आहेत. मात्र कामगार आयुक्तालयात त्यांची खास ओळख आहे ती ‘बालमजुरीच्या प्रश्नावर विशेष कार्याची. याच बालमजुरीच्या प्रश्नांवर चोहोबाजूंनी प्रकाश टाकणारं, त्यातल्या मुलांना मुक्त करताना आलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करणारं पुस्तक म्हणजे ‘पोऱया.’

खरं तर आपली आणि या पोऱयाची कळत नकळत कधीतरी भेट झालेलीच असते. पण ही ओझरती ओळख म्हणजे परिचय नव्हे. या पुस्तकातली जन्नत, शंभूनाथ, ‘अ’ अफजलचा ही प्रकरणं आपल्याला बालमजुरीचा खराखुरा परिचय घडवतात.

बारा वर्षांच्या जन्नतला शिकायचं आहे, पण आई आणि सर्व घरावर मूक कब्जा करणारा दलाल यांच्या कचाटय़ात ती सापडली आहे. अशा वेळेस जन्नतला कामावर ठेवणारा मालक, घरातला दलाल यांच्याशी कधी गोड बोलून, कधी कायद्याचा धाक दाखवून तर कधी बालकल्याणाच्या योजनांमध्ये आवश्यक ते बदल करून पोळ यांनी जन्नतला बालमजुरीतून मुक्त केलं. ही केस 1994 सालची. शंभूनाथची कथा आणखीच वेगळी. हा 10 वर्षांचा, खात्यापित्या घरचा मुलगा. आपल्या आईचे कानातले चोरून, ते विकून राजस्थानातून मुंबईत पळून आला. एका चहाच्या टपरीवर स्वतःच कामाला लागला. काम करून दिवसातून दोन सिनेमा बघायचे, इतकाच उद्योग. सापडल्यावर बालसुधारगृहात पाठवलं तर तिथूनही पळून आला. या शंभूनाथच्या निमित्ताने लिहिलेलं ‘अमिताभ बच्चन’ हे प्रकरण आपल्याला भारतीय सिनेमाकडे बघायची एक वेगळी दृष्टी देतं. कोवळ्या, कुमारवयीन मुलांना पडदा आणि खरं जग यातला फरक कळत नाही आणि असे शेकडो शंभूनाथ शिक्षण सोडून परागंदा होतात.

या पुस्तकातल्या सर्वात भयाण कथा आहेत अफजल व काwसरच्या. आठ-दहा वर्षांचा अफजल… त्याला नक्की कोणत्या गावातून पळवून आणलं होतं, कोणत्या गाळ्यात कामाला लावलं होतं आणि त्याच्या मालकाला काय शिक्षा झाली हे आपल्याला कळत नाही, पण अफजल आपल्या डोळ्यासमोरून हलत नाही. कामात चूक झाली तर अफजलचा मालक त्याला पाठीवर विडय़ांचे चटके देत असे. त्याच्या मुंबईतल्या आत्याला सगळ्याची कुणकुण लागली आणि ती अफजलपर्यंत पोहोचली तेव्हा फार उशीर झाला होता. चटके, लाथाबुक्क्यांनी जर्जर झालेला अफजल रस्त्यावर उघडा पडला होता. आत्याने आणि पोलिसांनी प्रकरण धसास लावलं, पण अफजल या जगातूनच मुक्त झाला. इतर पंधरा मुलांच्या सुटकेसाठी अफजलने आपल्या जिवाचं बलिदान दिलं जणू. मोहम्मद काwसरच्या मालकाने रागाच्या भरात काwसरच्या हाताची नखं उपटायला सुरुवात केली, त्या वेदनेने कळवळलेल्या काwसरची किंकाळी ऐकून इतर बालमजूर घाबरले, ओरडायला लागले. लोक गोळा झाले. पोलीस मालकापर्यंत पोहोचले. जिवावर बेतलेलं नखांवर निभावलं. कौसर वाचला, बालसुधारगृहात गेला. मुंबईत बालमजुरीविरुध्द कृती दलाची स्थापना झाली. या कृतीदलाने 2005 ते 2008 या तीन व वर्षात माहीम-धारावी, कुर्ला, गोवंडी अशा मुंबईतील झोपडपट्टीतून तब्बल 2500 मुलांची मुक्तता केली.

गरिबी हे बालमजुरीचं प्रमुख कारण आहे, अशी आपली समजूत असते, पण लेखक पुस्तकात हे सप्रमाण सिद्ध करतात की बालमजुरीचं प्रमुख कारण आहे मालकांना होणारा प्रचंड आर्थिक फायदा. अगदी ब्रिटीश काळापासून बालमजुरांना कामगार कायद्यात येनकेन प्रकारे सामावून घेतलं गेलं याचं एकमेव कारण – मुलांना अत्यंत अल्प दरात राबवून घेता येतं. जगाचा काहीच अनुभव नसलेली ही मुलं आपल्या आजूबाजूच्या दहा बाय दहाच्या खोलीलाच जग समजतात.

या केसेस सोडविताना बालमजुरी प्रतिबंधक कायदा, त्यातले बदल, त्यातली शिक्षणाकडे जाणारी वाट प्रशस्त करणं आणि पुनर्वसनाचा खरा अर्थ समजून घेणं हे सगळंच लेखकाच्या कामाचा व ध्यासाचा भाग बनून गेलं. अगदी शाळा-कॉलेजच्या रियुनियनमध्येदेखील लेखकाने बालमजुरीचा विषय छेडला. हे पुस्तक हा त्याचाच एक भाग आहे की बालमजुरी बंद व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने कटिबद्ध असलं पाहिजे. बालमजुरी प्रतिबंधक कायद्याची काही कलमं पुस्तकात ओघाने येतात. धोकादायक, बिगर धोकादायक व्यवसायांची व्याख्या समजते. बालमजुरीचा इतिहास कळतो. या चकचकीत शहराचा न दिसलेला एक भेसूर कोपरा आपल्याला खडबडून जागा करतो. पण तरीही इतक्या गंभीर विषयावर लिहिताना लेखकाने पुस्तक जडजंबाळ, गंभीर केलेलं नाही.

बालमजुरीची आजची स्थिती शोधायची म्हटली तर काम कठीणच आहे, कारण हा सगळा छुपा कारभार असतो. धाडी घालून, खबरे नेमून ही मुलं शोधावी लागतात. 2018 चा एक पाहणी अहवाल सांगतो की, हिंदुस्थानात साधारण 10 लाख बालकामगार आहेत आणि त्यातले 30 हजार एकटय़ा मुंबईत आहेत. मुलांच्या प्रश्नांवर गेली सत्तर वर्षे काम करणारी युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय संस्था म्हणते की जगभरातली बालमजुरी 2000 ते 2016 या वर्षांत अनेक प्रयत्नांमुळे 640 लाखांवर आली होती, ती कोविडच्या संकटामुळे 2020 या एका वर्षात 1600 लाख इतकी वाढली. बालमजुरीचं दुष्टचक्र भेदायचं असेल तर शैलेंद्र पोळ यांच्यासारख्या नेक अधिकाऱयांना आपण साथ द्यायला हवी.

 

पोऱया

लेखक ः शैलेंद्र पोळ

प्रकाशक ः मनोविकास प्रकाशन

पृष्ठs ः 144, मूल्य ः रु. 170/-