
पुणे शहरातील हडपसरमधील सय्यदनगर भागात नामांकित बाटा कंपनीच्या नावे बनावट शूज, चप्पलची विक्री सुरू असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. येथील बाटा शू स्टाईल, आर्यन सेंटर याठिकाणी छापा टाकून पोलिसांच्या पथकाने तब्बल 1 लाख 12 हजार रुपयांचे बनावट 75 नग जप्त केले. तर, दुकानधारकावर हडपसर पोलीस ठाण्यात कॉपीराईट अॅक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान पांडुरंग कोळी (39, रा. सय्यदनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत बाटा कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सिंग देवरा (रा. पाली, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखा यूनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली. शहरात नामांकित ब्रॅण्डच्या नावे बनावट उत्पादन विकली जात असल्याचे यापुर्वी ़गुन्हे शाखेने अनेकदा समोर आणले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यापुर्वी लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये कारवाई करून नामांकित कंपनीच्या नावे बनावट कपड्यांची विक्री करणार्या पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यांच्याकडून पावणे तीन लाख रुपये किंमतीचे बनावट टी शर्ट, जॅकेट, ट्रॅक पँट आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान, हडपसरमधील बाटा शु पॉईट येथील एका दुकानात बाटा कंपनीच्या नावे बनावट उत्पादने विकली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानूसार यूनिट पाचचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अंमलदार रमेश साबळे यांच्यासह पथकाने शूज विक्री सुरू असलेल्या दुकानावर छापा टाकला. यावेळी येथून तब्बल 1 लाख 12 हजार 425 रुपये किंमतीचे 75 नग जप्त केले आहेत. तर, विक्रेत्यावर कॉपीराईट अॅक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
—
…बनावट उत्पादनावर गुन्हे शाखेची नजर
शहर परिसरात अनेक ठिकाणी नामांकित ब्रॅण्डचा लोगो वापरून बनावट वस्तूंची विक्री केली जाते. पोलिसांनी यापुर्वी अनेकदा हे प्रकार उघडकीस आणले आहेत. अशा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर असून नागरिकांनी देखील खरेदी करताना काळजी घ्यावी. तसेच, काही बनावट आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
































































