
पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या दोघा सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 18 लाख 18 हजार रूपयांच्या प्रत्येकी चार मोटारी आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोक्कातील फरारीचा समावेश आहे. सनीसिंग पापासिंग दुधाणी (वय – 22), सोहेल जावेद शेख (वय – 21, दोघेही रा. बिराजदारनगर, हडपसर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातून हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने हद्दीत कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी घरफोडीतील सराईत गुन्हेगार हडपसरमधील बिराजनगरमध्ये फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक समीर पांडुळे आणि प्रशांत टोणपे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून पाठलाग करून सनीसिंग दुधाणी आणि सोहेल शेख यांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी हडपसर, कोरेगाव पार्क, भोसरी, चाकण, कोंढवा परिसरामध्ये घरफोडीसह वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी केलेले 12 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, समीर पांडुळे, अविनाश गोसावी, अकबर शेख, प्रशांत टोणपे, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, शशिकांत नाळे, सचिन जाधव, सैदोबा भोजराव, संदीप राठोड यांच्या पथकाने केली.





























































