बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

leopard

बिबट्याच्या हल्ल्यात एक आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना तालुक्यातील केळवंडी येथे घडली. बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलाचा बळी जाण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केळवंडी येथील गणेश आठरे यांचा आठ वर्षाचा मुलगा सक्षम आठरे हा आपल्या घरात झोपला होता. त्याचे आजोबा घरासमोर असलेल्या पडवीत झोपले होते. रात्री एकच्या सुमारास सक्षम याला उलट्या झाल्याने तो घराच्या बाहेर आला व त्यानंतर तो आपल्या आजोबा शेजारी झोपला. पहाटे साडेतीनच्या सुमारास आठरे यांच्या तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने घराच्या पडवीत येत सक्षम याला उचलून नेले. सक्षमने आरडाओरडा केल्यानंतर त्याचे आजोबा व शेजारील नागरिक मदतीस धावले मात्र मात्र तो पर्यंत बिबट्याने सक्षमला उचलून तुरीच्या शेतात नेले. ग्रामस्थांनी दगडफेक करत बिबट्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला, मात्र उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला कळवल्यानंतर वनसरंक्षण अधिकारी निरभवने हे घटनास्थळी आले व त्यांनी फटाके फोडल्यानंतर आज सकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने तुरीच्या शेतातून पळ काढला. ग्रामस्थ शेतात गेले असता छिन्नविछिन्न अवस्थेत सक्षमचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, याच महिन्यात तालुक्यातील मढी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात श्रेया साळवे या पाच वर्षीय मुलीचा बळी गेला होता. तर चार दिवसांपूर्वी माणिकदौण्डी येथील नबाजी ढाकणे यांच्या एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडला होता. या परिसरात असलेल्या डोंगरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असून या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी या परसिरातील ग्रामस्थांमधून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या