
वाघोली परिसरातून हायवा ट्रक चोरी करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या गाडीचे पार्ट काढून वाहनचोरी करणार्या टोळीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. यातील आरोपी हे जालना, संभाजीनगर जिल्ह्यातील असून त्यांनी वाघोली येथून ट्रक चोरला होता. पोलिसांनी तब्बल 342 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक केली.
लक्ष्मण बाबुराव गाडे (38, रा. पाचोड गाव, जि. संभाजीनगर), फिरोज मकबुल शेख (26, रा. आंबड, जालना), महाजन दगडुसिंग सुंदर्डे (46, रा. आंबड, जालना) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांना मदत करणारे साथीदार शाहरूख मकबुल शेख, नकीम मन्सूर सय्यद, अस्लम आबिद्दीन सय्यद, जीतु शर्मा, रजीउद्दीन सय्यद यांचा शोध घेण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हायवा ट्रक चोरी गेला होता. याचा समांतर तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून सुरू असतानाच अंमलदार अमोल सरतापे, विनायक येवले यांनी लोणीकंद फाटा ते संभाजीनगर पर्यंत महामार्गावरील तब्बल 342 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. यामध्ये गाडे याला निष्पन्न करून त्याच्या शेतातून ट्रकची नंबरप्लेट आणि इतर काही पार्ट जप्त करण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याला या वाहनचोरीसाठी फिरोज, महाजन यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी जालन्यातून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील मूख्य आरोपी गाडे याच्यावर वाहनचोरी, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न असे विविध वीस गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विवेक पाडवी, अंमलदार अमोल सरतापे, विनायक येवले, संदीप येळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
































































