
पुण्यातील सासवडमध्ये खाद्यपदार्थाच्या गाडी मालकाने दोन कचरा वेचणाऱ्यांना क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी खाद्यपदार्थाच्या गाडी मालकाला अटक केली आहे. नीलेश उर्फ पप्पू जयवंत जगताप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील चिखले यांनी 30 मे रोजी याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. भोंगळे वाईन शॉपजवळ 24 मे रोजी सुमारे 50 ते 60 वयोगटातील दोन अज्ञात व्यक्ती जखमी अवस्थेमध्ये पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच सासवड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना जखमींना ससून रुग्णालयामध्ये दाखल केले. यापैकी एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची 30 मे रोजी प्राणज्योत मालवली.
अधिक चौकशी केली असता पोलिसांना साक्षिदारांनी सदर घटनेची विस्तृत माहिती दिली. आरोपी नीलेश जगताप याने 23 मे रोजी दोन कचरा वेचणाऱ्यांना बेदम मारहाण केली होती. तसेच शेवंताबाई सखाराम जाधव (वय – 65) या महिलेलाही लाठ्या-काठ्याने मारहाण केली. उन्हाचे दिवस असल्याने सावलीसाठी कचरा वेचणारे त्यांच्या गाडीजवळ बसत असल्याच्या क्षुल्लक कारणातून आरोपीने ही मारहाण केली होती. या मारहाणीत शेवंताबाई जखमी झाल्या, तर इतर दोघे घटनास्थळीच बेशुद्ध पडले. आरोपीने बेशुद्धावस्थेत असणाऱ्यांवर उकळते पाणीही फेकले. सदर आरोपीने दुसऱ्या दिवशीही बेशुद्धावस्थेत असणाऱ्या दोघांना मारहाण केली.
सासवडमधील खंडोबा नगर येथील रहिवासी असलेल्या साक्षीदार आणि शेवंताबाई जाधव यांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी जगताप याला भादवि कलम 302 (खून), 326 अंतर्गत अटक केली.
आरोपी जगताप याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दोन्ही मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते परिसरात फिरत होते. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.





























































