
>>प्रतिक राजूरकर
कधी सार्वजनिक कार्यक्रमात पुतीन चालताना लंगडताहेत, तर कधी पुतीन शासकीय बैठकीत अस्वस्थ आणि अशक्त दिसताहेत या आशयाच्या बातम्या आणि तर्कावर पुतीनच्या आजाराचे विविध प्रकारे निदान सध्या केले जात आहे. त्याला रशियाकडून कुठलाच दुजोरा मिळालेला नाही. केवळ एकतर्फी चर्चांनी पुतीन आजारी असल्याचे दावे प्रतिदावे केले गेले आहेत. पुतीनच्या आजारपणाच्या बातम्यांनी रशियन सैन्याचे खच्चीकरण हासुद्धा एक हेतू यामागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
गेले काही आठवडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या प्रकृतीबाबत अनेक बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. यातून पुतीनबाबत संभ्रम निर्माण व्हावा हा हेतू आहे की पुतीनबाबत दावे करणाऱयांना पुतीन यांची अचानक काळजी वाटू लागली आहे हे समजण्यापलीकडे आहे. वेगवेगळ्य़ा स्तरांवर पुतीन यांच्या आजाराचे प्रत्येकाने आपापल्यापरीने निदान केले आहे. काहींच्या मते पुतीन यांना रक्ताचा कर्करोग असून काहींनी त्याचे निदान कंपवात असल्याचा दावा केला आहे. काहींना पुतीन हे अस्वस्थ आहेत, पण नक्की निदान करता आलेले नाही, असे वाटते. काही माध्यमांनी पुतीन यांना पोटाचा कर्करोग, ग्रंथींचा कर्करोग असे अनेक प्रकारचे निदान केल्याचे प्रकाशित केले आहे. काही दाव्यांनुसार पुतीन हे वैद्यकीय उपचार, औषध सेवनामुळे अधिक अशक्त असल्याचे दावे केले आहेत. काही माध्यमांत तर पुतीन यांच्यावर लवकरच शस्त्र्ाक्रिया होणार असून ते स्वतःच्या अधिकाराची सूत्रे ही रशियाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांकडे सोपवणार असल्याचेसुद्धा प्रकाशित झाले आहे. या बातमीला महिना उलटून गेला आहे, परंतु अद्याप पुतीन यांच्यावरील शस्त्र्ाक्रियेबाबत कुठलीच माहिती समोर आलेली नाही. ब्रिटनच्या ‘एक्स्प्रेस’ व एकदोन मोजक्या माध्यमांत प्रकाशित बातमीनुसार पुतीन यांच्यावर 11 व 12 मेच्या रात्री यशस्वी शस्त्र्ाक्रिया करण्यात आली असून ती कर्करोगाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या बातमीला दुजोरा मिळाला नसून सध्या केवळ युक्रेनवर पुतीन करत असलेल्या शस्त्र्ाक्रियेच्या बातम्यांनी बहुतांशी माध्यमे व्यापलेली आहेत.
ब्रिटनचे कधीकाळी गुप्तहेर असलेले क्रिस्टोफर स्टीले यांनी एका मुलाखतीत दावा केला आहे की, पुतीन हे कुठल्या तरी दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. पुतीन सतत वैद्यकीय तज्ञांच्या सोबत असतात. संरक्षण खात्याच्या एक तासाच्या बैठकीत पुतीन ठरावीक अंतराने थांबून बैठक पार पाडतात. क्रिस्टोफर स्टीले हे यापूर्वी पण अनेकदा पुतीन, रशियाबाबत विधाने करून चर्चेत आले आहेत. क्रिस्टोफरने याअगोदर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2016 साली झालेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने मदत केल्याचा आरोप केला होता. त्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाले होते. क्रिस्टोफर हे 1987 ते 2009 या काळात ब्रिटिश गुप्तहेर संस्था एमआय 6 येथे कार्यरत होते. निवृत्तीनंतर क्रिस्टोफर यांनी स्वतःची खासगी गुप्तचर संस्था सुरू केली आहे.
काही पुतीननिष्ठांनी तर चक्क पुतीन आजारी असून पुतीन यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती सर्व बैठकांना हजेरी लावते आहे, त्याची पुतीन यांनी व्यवस्था केली आहे, असे धक्कादायक दावे केले आहेत. हे सगळं जागतिक पटलावर पहिल्यांदाच घडत आहे असे नाही, तर याअगोदर अमेरिका-इराक युद्धावेळी सद्दाम हुसेनबाबत अशा अनेक रंजक कथा ऐकिवात होत्या. अगदी अलीकडे कोरोना काळात याच आशयाच्या बातम्या उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगबाबतसुद्धा प्रकाशित झाल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल. उल्लेखनीय म्हणजे या सर्व अफवा, बातम्या या आंतरराष्ट्रीय पातळीवर हुकूमशहा म्हणून नावारूपास आलेल्यांच्या बाबतीत अधिक जोरकसपणे समोर आल्याची अनेक उदाहरणे आहेत.
पुतीन यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या चर्चांना चालना देण्यासाठी निमित्त ठरले एक ध्वनिमुद्रित संभाषण. अमेरिकेचे एक मासिक ‘न्यू लाइन्स’च्या हाती हे संभाषण असून त्यात पुतीन यांच्या जवळचे सहकारी एका पाश्चिमात्य देशातल्या धनाढय़ व्यक्तीला पुतीन हे कर्करोगाने ग्रस्त असल्याचे सांगत आहेत. हे संभाषण कुणाचे कुणासोबत आहे याबाबत नावे दिलेली नाहीत हे विशेष. त्यामुळे या संभाषणाची विश्वासार्हताच वादाच्या भोवऱयात आहे. संभाषणात युक्रेनवर हल्ला करण्याअगोदर पुतीन यांच्या पाठीवर शस्त्र्ाक्रिया झाल्याचा उल्लेख असून पुतीन हे वेडे झाले असल्याचे पुतीनच्या जवळचा सहकारी बोलला असल्याचा दावा केला जात आहे. कधी सार्वजनिक कार्यक्रमात पुतीन चालताना लंगडताहेत, तर कधी पुतीन शासकीय बैठकीत अस्वस्थ आणि अशक्त दिसताहेत या आशयाच्या बातम्या आणि तर्कावर पुतीनच्या आजाराचे विविध प्रकारे निदान सध्या केले जात आहे. त्याला रशियाकडून कुठलाच दुजोरा मिळालेला नाही. केवळ एकतर्फी चर्चांनी पुतीन आजारी असल्याचे दावे प्रतिदावे केले गेले आहेत. पुतीनच्या आजारपणाच्या बातम्यांनी रशियन सैन्याचे खच्चीकरण हासुद्धा एक हेतू यामागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकूणच काय, तर रशिया-युक्रेन युद्धात तिसऱया राष्ट्राकडून पुतीन यांना आजारपणातून लक्ष्य करण्याची ही युद्धनीती असण्याची शक्यता अधिक बळावते. पुतीन शारीरिक दृष्टीने अस्वस्थ आहेत का याबाबत कुठलाही ठोस पुरावा नाही. मात्र युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारून पुतीन यांनी आपला नेमका आजार जगासमोर आणला आहे हे निश्चित!
ब्रिटन गुप्तचर यंत्रणा एमआय 6चे अधिकारी सर रिचर्ड डिअरलव्ह हे 1999 ते 2004 दरम्यान ब्रिटन गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते. त्यांनी दावा केला आहे की, 2023 सालापर्यंत पुतीन यांची राजवट पुतीनच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे संपुष्टात येईल. पुतीन यांची जागा रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव्ह घेतील असा सर रिचर्ड डिअरलव्ह यांचा अंदाज असल्याचे प्रकाशित झाले आहे. पुतीन यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या चर्चा या युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर मोठय़ा प्रमाणात माध्यमांत प्रकाशित झाल्या आहेत. ब्रिटनचे गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी, ब्रिटिश माध्यमांनी, ‘एक्स्प्रेस’, ‘इंडिपेंडंट’ इत्यादींनी या चर्चा जिवंत ठेवल्या आहेत. ब्रिटन हा युक्रेनवर रशियाकडून झालेल्या हल्ल्याचा सुरुवातीपासून विरोध करतो आहे. याचाच भाग म्हणून ब्रिटनकडून पुतीनबाबत जागतिक स्तरावर अशा चर्चा घडवून आणणे हे नियोजित असण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येणार नाही.





























































