उत्सव, टाळी-थाळी खूप  झालं, आता देशाला लस द्या! राहुल गांधींची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकट रोखण्याबरोबरच महामारीमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 385 दिवसांतही कोरोनाशी लढाई जिंकता आली नाही. उत्सव, टाळी-थाळी खूप झालं, आता देशाला लस द्या, अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

कोरोना विरोधातील लढाईला बळकटी मिळावी यासाठी पंतप्रधान मोदी यांनी टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे तसेच दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मात्र अद्यापही देशातील कोरोना संसर्ग संपलेला नाही. आता तर लसीकरण मोहिमेतदेखील लसींच्या तुटवडय़ामुळे अडथळा निर्माण होताना दिसत आहे. याकडे राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधानांचे लक्ष वेधत लसीची निर्यात बंद करा आणि जे आपले गरीब बांधव आहेत त्यांना ती उपलब्ध करून द्या. तसेच लसीच्या उत्पन्नासाठी सहकार्य करा, अशी मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदी तुम्ही म्हणाला होता की, कोरोना विरोधातील लढाई 18 दिवसांत जिंकली जाईल. तुम्ही टाळ्या-थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाईलचा लाइटदेखील लावायला लावला मात्र कोरोना वाढतच गेला. आता दुसरी लाट आहे आणि लाखो लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या पुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या, असे आवाहन राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओतून केले आहे.