
जेव्हा सत्तेतून एखादा हुकूमशाही मानसिकतेचा सत्ताधारी जातो त्यावेळी त्याची जनताच कशी पळताभुई थोडी करते याची उदाहरणे आठवा. जिथे मुघलांपासून पोर्तुगीज ते ब्रिटिशांचा या देशाने माज उतरवला, तिथे स्वकीयांचा माज इथली जनता उतरवणार नाही असं वाटतंय का असा सवाल सत्ताधाऱ्यांना करत, मोदी-शहा जोडीचा माज हा देश उतरवेल, असा सूचक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या दडपशाहीवरून राज ठाकरे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करत केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मोदी आणि शहा या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे. या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून सत्ता मिळवली आणि ती मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्या विरोधात निदर्शने केली म्हणून जर आंदोलकांना चिरडले जाणार असेल तर या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढले पाहिजे! असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
त्याचवेळी राज ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना No nation can be grateful at the cost of its liberty असे उद्गार काढले होते. याचा संदर्भ देत एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱहेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत. बाबासाहेबांचे हे वाक्य आज पुन्हा म्हणावे लागते, असे सांगत त्यांनी मोदी-शहांच्या हुकूमशाही कारभाराचा समाचार घेतला आहे.
ज्ञानेश कुमारांबद्दल इतपं प्रेम का?
देशातील 20-30 वर्षांचे तरुण-तरुणी अस्वस्थ आहेत. त्यांना त्यांचे भविष्य दिसत नाहीये, म्हणून ते शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत? ज्ञानेश कुमारांबद्दल इतपं प्रेम का? हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.






















































