भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार नाही – रामदास आठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महायुतीत असलो, तरी भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढविणार नाही,’ असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभा निवडणुकीत रिपाइंला सोलापूर व शिर्डी या दोन जागा देण्याची मागणीही आठवले यांनी केली.

‘राज्यात महायुतीमध्ये तीन पक्ष असा कायम उल्लेख होतो; परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हासुद्धा महायुतीमध्ये आहे. आम्हाला विसरून चालणार नाही. त्यामुळे येणाऱया लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला सोलापूर आणि शिर्डी या दोन जागा मिळाल्याच पाहिजेत,’ अशी मागणी आठवले यांनी केली. ‘सोलापुरातून राजा सरवदे आणि शिर्डीतून मी स्वतः निवडणूक लढवेन,’ असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढविणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, आठवले म्हणाले, ‘महायुतीतील राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे शिंदे यांना त्यांच्याच पक्षाचे चिन्ह मिळाले आहे. आमचा पक्षही वेगळा असून, आम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहोत. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रश्नच येत नाही,’ असा खुलासा आठवले यांनी केला.

दरम्यान, ‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे शक्य नाही. केंद्रीय पातळीवर त्याचा विचार व्हावा लागेल, तरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो,’ असेही रामदास आठवले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.