
शिर्डीत संगमनेर येथील सुशिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यात एकाच कुटुंबातील पाच आरोपी असून त्यापैकी मंगेश त्रिभुवन हे शिर्डी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी तरुणी उच्चशिक्षित असून नोकरी करते. मुख्य आरोपी आकाश त्रिभुवन यांची पीडितेशी ओळख होती. ओळखीचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर झाले. आकाशने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिर्डी येथील हॉटेलवर व पुणे येथील हॉटेलवर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. पिडीतेने ही बाब घरच्यांना व आरोपीच्या कुटुंबियांना सांगितली. मात्र, त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे तिने शिर्डीत विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तिच्यावर वेळेत उपचार झाल्याने तिचा प्राण वाचला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
शुक्रवारी पीडित तरुणीने फसवणुकीसंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी आकाश रमेश त्रिभुवन, रमेश वामन त्रिभुवन, मंगेश वामन त्रिभुवन, राजेंद्र वामन त्रिभुवन, संजय वामन त्रिभुवन (सर्व रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) एकच कुटुंबातील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे शिर्डीचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व सहायक पोलीस निरीक्षक दातरे करत आहे.
































































