Ratnagiri crime news – खेड येथे दोन विनापरवाना बंदुका अन् 12 जिवंत काडतुसे हस्तगत, दोघांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड परिसरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंध पेट्रोलींग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोरज शिवफाटा, शेवरवाडी, खेड या ठिकाणी छापा टाकून कारवाई करत विनापरवाना वापरल्या जाणाऱ्या दोन सिंगल बैरल काडतूसच्या बंदुका आणि 12 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विनापरवाना बंदुका वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार केले होते.

पोलीस कारवाईदरम्यान खेड तालुक्यातील मौजे बोरज शिवफाटा शेवरवाडी येथे अनिल भिकू गुहागरकर (वय – 53, रा. बोरज शिवफाटा शेवरवाडी) याच्याकडे 27 हजार 500 रुपये किंमतीची सिंगल बॅरल काडतूसची बंदुक आणि 8 जिवंत काडतुसे बिगर परवाना आढळून आली. तसेच राजेश गजानन साळवी (वय – 53, रा. बोरज शिवफाटा शेवरवाडी) याच्याकडे 26 हजार 700 रुपये किंमतीची सिंगल बॅरल काडतूसची बंदुक आणि 4 जिवंत काडतुसे बिगर परवाना आढळून आली. दोघांकडील 53 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, सागर साळवी, योगेश नार्वेकर, पोलीस नाईक दत्ता कांबळे यांनी केली.