रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्याची इस्रोवारी; अनुभवला अवकाश तंत्रज्ञानातील सुवर्ण इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान या योजनेतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 27 विद्यार्थ्यांनी इस्रो अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन हिंदुस्थानची अंतराळ संशोधन केंद्रातील सुवर्ण कामगिरी अनुभवली. विद्यार्थ्यांनी इस्रोमध्ये रॉकेट प्रत्यक्ष अवकाशात कसे झेपावते याचा थरार अनुभवला. रत्नागिरी जिल्हा परिषदेने यंदा विद्यार्थ्यासाठी इस्रो अंतराळ संशोधन केंद्राच्या भेटीचे आयोजन केले होते. त्याकरीता विद्यार्थ्यांमध्ये चाळणी परीक्षा घेऊन त्यांची निवड करण्यात आली.

26 हजार विद्यार्थ्यांमधून 4 टप्प्यांमध्ये चाळणी परीक्षा घेत इस्रोसाठी 27 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 16 जानेवारी रोजी हे 27 विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेची टीम दौऱ्यासाठी रवाना झाली. गोवा येथून बंगळूरपर्यंत विद्यार्थ्यांनी विमानाने प्रवास केला. बंगळूर येथील विश्वेश्वरैया औद्योगिक आणि प्रौद्योगिक संग्रहालयाला विद्यार्थ्यांनी भेट दिली. यंत्र कशी चालतात, राइट बंधूनी तयार केलेल्या पहिल्या विमानाची प्रतिकृती आणि अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान याविषयीची माहिती घेतली. त्यानंतर बंगळूरहून हे विद्यार्थी तिरुअनंतपुरम येथे रवाना झाले. त्यांनी इस्रो अंतराळ संशोधन केंद्राला भेट दिली.

इस्रो अंतराळ संशोधन केंद्रामध्ये रॉकेट प्रत्यक्ष अवकाशात कसे झेपावते याचा चित्तथरारक अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी विक्रम साराभाई स्पेस सेंटरलाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. हिंदुस्थानने अवकाश संशोधन केंद्रात केलेली प्रगती विद्यार्थ्यांनी अनुभवली. यावेळी 13 मिनीटांची एक फिल्म विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. विद्यार्थ्यासोबत या दौऱ्यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, मुख्य व वित्त लेखाधिकारी भानुदास शेळके, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी एस. जे. मुरकूटे आणि संदेश कडव सहभागी झाले होते.