रिलायन्स ही गुजराती कंपनी!

रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम गुजराती कंपनीच राहणार, असे विधान रियायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये केले. गुजराती ही माझी मातृभूमी आणि कर्मभूमी आहे. गुजराती असल्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

रिलायन्सने गेल्या 10 वर्षांत संपूर्ण देशात 12 लाख कोटी रुपये गुंतवले आहेत, त्यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतकणूक गुजरातमध्ये झाली आहे. गुजरातमधील रिलायन्सची गुंतवणूक पुढील 10 वर्षे सुरू राहील आणि 2030 पर्यंत गुजरातच्या एकूण हरित ऊर्जेच्या वापरापैकी निम्मी ऊर्जा त्यांची कंपनी तयार करेल, अशी घोषणा अंबानी यांनी केली. देशभर विस्तारलेल्या रिलायन्स उद्योगसमूहाची पाळेमुळे महाराष्ट्रात रुजली आहेत. खुद्द अंबानी कुटुंबीयही मुंबईतच राहून आपला उद्योगधंदा सांभाळत आणि वाढवत आहेत. त्यामुळेच त्यांची गुजरातबाबतची विधाने चर्चेत आली आहेत. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

जेव्हा गुंतकणूवदार नव्या हिंदुस्थानचा विचार करतात तेव्हा ते नवीन गुजरातचा विचार करतात, असे मुकेश अंबानी म्हणाले. गेल्या दहा वर्षांत रिलायन्सने देशात केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक गुजरातमध्ये केली आहे.

गुजरातसाठी पाच वचने

पुढील 10 वर्षांत लक्षणीय गुंतवणूक, धीरूभाई अंबानी गिगा कॉम्प्लेक्स, देशातील पहिली कार्बन फायबर सुविधा, शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना, क्रीडापटू तयार करण्यासाठी सक्रिय योगदान, अशी पाच वचने त्यांनी गुजरातला दिली.

गुजरात बहू सरस छे

माझे वडील धीरूभाई अंबानी मला लहानपणी सांगायचे की, गुजरात ही तुमची मातृभूमी आहे, गुजरात हे नेहमीच तुमचे कार्यक्षेत्र राहिले पाहिजे. आज मी पुन्हा एकदा जाहीर करतो की, रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील. रिलायन्सचा प्रत्येक व्यवसाय माझ्या 7 कोटी गुजराती बांधवांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगत मुकेश अंबानी यांनी गुजरात अने गुजराती बहू सरस छे… असा सूर लावला.