
>> देवेंद्र जाधव
जग कितीही पुढे गेलं तरी वाचनवेड अजूनही काही माणसांमध्ये टिकून आहे. वाचनाची माध्यमं आता बदलली असली तरी जिथून मिळेल तिथून पुस्तकं वाचण्याचा सपाटा लावणारे काही वल्ली आजही सापडतात. अशाच एका ग्रंथवेडय़ाने स्वतः वाचलेल्या काही इंग्रजी पुस्तकांचा आपल्याला करून दिलेला परिचय म्हणजे ‘हा ग्रंथसागरू येव्हडा’ हे पुस्तक होय.
असं म्हणतात की, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा प्रसार करावा, जेणेकरून ते ज्ञान इतरांनाही अनुभवता येतं. विवेक गोविलकर यांनी बहुधा हा शुद्ध हेतू मनात बाळगून या पुस्तकाचा घाट घातला असावा. या पुस्तकात त्यांनी स्वतः केलेल्या काही इंग्रजी पुस्तकांचं परीक्षण आणि परिचय अशा स्वरूपाचा लेखसंग्रह समाविष्ट केला आहे.
भव्य महासागरातून मोती वेचणं तसं अवघड काम. त्याचप्रमाणे भव्य अशा पुस्तकांच्या प्रवाहामधून विवेक गोविलकरांनी स्वतः वाचलेल्या काही निवडक इंग्रजी पुस्तकांची ओळख वाचकांना करून दिली आहे. या पुस्तकांची ओळख करून देताना त्यांनी एकूण सहा वर्गवारीत या पुस्तकांची विभागणी केली आहे. याचं वैशिष्टय़ असं की, प्रत्येक वर्गवारीत इंग्रजी लेखकाच्या पुस्तकाबरोबरच एका हिंदुस्थानी लेखकानं लिहिलेलं इंग्रजी पुस्तकसुद्धा आवर्जून समाविष्ट केलेलं दिसून येतं.
या पुस्तकात व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र, इतिहास आणि आत्मचरित्र, राजकीय आणि कायदेविषयक, विज्ञान-तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र, कादंबरी आणि संकीर्ण अशा एकूण सहा वर्गवारी दिसतात. याअंतर्गत त्या त्या गटाशी संबंधित पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. यामध्ये वाचकप्रियता आणि जागतिक स्तरावर प्रचंड खपाची विक्रमी नोंद करणाऱया पुस्तकांचा परिचय विवेक गोविलकरांनी करून दिला आहे.
देवदत्त पटनायक लिखित ‘बिझनेस सूत्र’, मलाला युसूफझाई यांचं आत्मचरित्र, अर्थशास्त्राची नवी परिमाणं मांडणारी ‘द ग्रेट एस्केप’ आणि ‘सुपर फ्रीकोनॉमिक्स’ ही दोन पुस्तकं, त्याचप्रमाणे ‘द सेलाउट’, ‘मादोरुबागन’ या कादंबऱया, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लावणारं दलाई लामा आणि डेझमंड टुटू यांचं ‘द बुक ऑफ जॉय’ हे पुस्तक इ. अनेक पुस्तकांचं विवेक गोविलकर यांनी अत्यंत अभ्यासू पद्धतीने लेखन आणि विश्लेषण केलं आहे.
विवेक गोविलकर यांनी लिहिलेली पुस्तक परीक्षणं वाचताना त्यांनी पुस्तकांचं सखोल चिंतन, वाचन आणि मनन केलेलं दिसून येतं. पुस्तकाच्या मुळाशी जाऊन त्यांनी अभ्यासपूर्वक पद्धतीने परीक्षण केलेलं दिसून येतं. इंग्रजी पुस्तकांची ही परीक्षणं वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, इंग्रजी लेखक हे आपल्या पुस्तकात एखादी समस्या मांडताना त्या समस्येचं खोल विश्लेषण आणि आपल्यापरीने निराकरण करतात. त्याचबरोबर परंपरावादी मूल्यं तोडू पाहत ही इंग्रजी पुस्तकं नवीन मूल्यं योग्य कारणांनिशी समाजात रुजू करू पाहतात. ही मूल्यं समाजासाठी वरवरून धक्कादायक वाटत असली तरी त्यांचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यास ही तत्त्वं सध्याच्या जगात तितकीच गरजेची असलेली जाणवतात.
विवेक गोविलकरांनी आपल्या ओघवत्या शैलीत या इंग्रजी पुस्तकांचा मूळ गाभा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. तसेच त्यांनी प्रत्येक पुस्तक परिचयाखाली त्या विशिष्ट पुस्तकाची मूळ तसेच किंडल किंमतसुद्धा नमूद केली आहे. खूपदा वाचक म्हणून आपण आपल्या मातृभाषेतलं पुस्तक वाचायला प्राधान्य देतो. विवेक गोविलकर लिखीत ‘हा ग्रंथसागरु येव्हडा’ हे पुस्तक वाचल्यानंतर जगभरातील लेखक कशा प्रकारे एखादा विषय मांडत आहेत याची प्राथमिक ओळख आपल्याला होते आणि नकळतपणे ही पुस्तकं वाचण्याची ओढ आपल्याला निर्माण होते.
हा ग्रंथसागरु येव्हडा
लेखक – विवेक गोविलकर
प्रकाशन – अनघा प्रकाशन
पृष्ठs – 212, मूल्य – 300 रु.





























































