पौगंडावस्थेतील मुलांना मार्गदर्शन

>> श्रीकांत आंब्रे

वयात येणाऱ्या मुलांच्या म्हणजे पौगंडावस्थेतील मुलांच्या मनात स्वतःच्या शरीरात आणि मनात होणाऱया बदलांबद्दल इतक्या शंकांचं काहूर माजलेलं असतं त्याची कल्पना या अवस्थेतून गेलेल्या सर्वांनाच असते. मुख्य म्हणजे त्यांच्या मनात दाटलेल्या शंकांची उत्तरं धड कोणीच देत नाही. मुलगे आणि मुली दोन्ही याला अपवाद नसतात. धड तारुण्य नाही आणि धड प्रौढावस्था नाही अशी ही मधली स्थिती मुलामुलींच्या मनात असंख्य प्रश्न उभे करते. पाठय़पुस्तकातून मिळणारं शास्त्रीय ज्ञान आणि काही पालक वा शिक्षकांकडून मिळणारी जुजबी माहिती पुरेशी नसते. या पौगंडावस्थेत मुले बिचारी गोंधळून जातात. आपापसात चर्चा करतात आणि काही वेळा चुकीची माहिती मिळाल्यामुळे अज्ञानाची शिकार होतात. बदलत्या जगातील वेगवान जीवनशैलीमुळे माहितीचे मायाजाल त्यांच्यासमोर हात जोडून उभे असले तरी त्यातून उद्याचा आदर्श नागरिक घडविण्याऐवजी अनेकदा विकृतीचा कळस पाहून मानसिक धक्क्यामुळे ती संभ्रमावस्थेत वावरतात. अशावेळी त्यांना समजून घेऊन त्यांच्या कलाने संवाद साधला तर त्या वयात जी माहिती त्यांना मिळायला हवी ती सहजपणे मिळते आणि फुलपाखरासारखी स्वच्छंदी असलेली शालेय वयातील मुले मनातल्या मनात कुढत न बसता शरीरातील आणि मनातील नव्या बदलांच्या जाणिवा नीट समजल्यामुळे आत्मविश्वासाने वावरतात. ‘टीनएज डॉट कॉम #[email protected] दहा ते चौदा वर्षे’ या पुस्तकात डॉ. वैशाली देशमुख यांनी या विषयावर मुलांना अगदी विश्वासात घेऊन त्यांच्याशी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. पौगंडावस्थेत प्रवेश करणाऱया सर्वच मुलामुलींना सतावणाऱया समस्या आणि प्रश्नांना सामोरे जाऊन त्यांचं त्यांनी शास्त्रीय पद्धतीने निराकरण केले आहेच; त्यापेक्षाही त्यात कोणताही बोजडपणा न आणता या मुलामुलींना आपलंसं करून त्याना बोलकं केलं आहे, तेही अगदी अनोख्या पद्धतीने. डॉ. वैशाली देशमुख या स्वतः पुण्यात ‘टीनएज क्लिनिक’ चालवतात. त्याशिवाय वेगवेगळय़ा कार्यशाळांमधून, शाळेत घेतलेल्या वर्गांमधून टीन क्लिनिकच्या विद्यार्थ्यांशी बोलून त्यांना या वयात मुलांना नेमके कोणते प्रश्न पडतात याचा अंदाज आलाच होता. या वयातील मुलांचे मानसशास्त्रही लक्षात आलं होतं. हा विषय फार गांभीर्याने मुलांसमोर मांडला तर तो मुलांच्या डोक्यावरून जाईल याची कल्पना त्यांना होती. म्हणूनच त्यांनी मुलामुलींची शिबिरं घेऊन त्या वर्गात त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. आपल्याला पडलेले प्रश्न विचारताना मुले लाजतील हे लक्षात घेऊन मुलामुलींना त्यांचे प्रश्न निनावी चिठ्ठीत लिहून त्या चिठ्ठय़ा एका बॉक्समध्ये गोळा केल्या आणि एकेक चिठ्ठी वाचून त्या प्रश्नांची उत्तरंही त्यांच्याशी गप्पा मारत उलगडून दाखवली. या सत्रातील चिठ्ठय़ा बाईंनी त्यांच्या पालकांना नंतर दाखवल्या तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते आ वासून पाहत राहिले. ‘‘बापरे, असं काहीही विचारतात ही मुलं? पण आम्हाला कधी बोलली नाहीत,’’ अशी त्यांची प्रतिक्रिया असते. पालक आणि मुलं, शिक्षक आणि मुलं हे नातंच असं आहे की, त्या दडपणातून मुलं त्यांना हे प्रश्न विचारूच शकत नाहीत. यात मुलींपेक्षा मुलांचा कोंडमारा अधिक होतो. मुलींना एकवेळ आई, मोठी बहीण, आत्या, मावशी समजवू शकतात, पण बाबांपुढे मुलांची याबाबतीत बोलण्यासाठी बत्तिशी उघडतच नाही. केवळ समंजस कुटुंबात असा संवाद घडू शकतो. म्हणूनच डॉक्टरबाईंचे हे संवादरूपी पुस्तक 10 ते 14 वयोगटातील मुलं-मुली तसेच पालक आणि शिक्षकांनीही वाचलंच पाहिजे. यात इशिता, जीवन, समीर आणि काही किशोरवयीन पात्रं कल्पून त्यांना या वयात गोंधळात टाकणाऱया अनेक प्रश्नांची डॉक्टरबाई स्वतः उत्तरं देतात. तीही त्यांना समजेल अशा भाषेत आणि शब्दांत. आम्हाला बोलायचंय, आम्ह मोठे होतोय, वादळं – विचारांची आणि भावनांची, मी निरोगी आहे? ओहो! मी बदलतोय! ये दोस्ती, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे – नक्की काय असतं? एकच प्याला, हाही विचार करू, मिरर मिरर ऑन वॉल…, आभासी जगात, आई-बाबा आणि मी, एक विचारू? या प्रकरणांच्या शीर्षकावरूनच एकंदर गप्पांची कल्पना येईल. सोबत संबंधित आकृत्या आणि काही उपयुक्त तक्तेही आहेत. हसत खेळत लैंगिक शिक्षण कसं द्यावं याचा हे पुस्तक म्हणजे आदर्श वस्तुपाठ आहे.

टीनएज डॉट कॉम #[email protected] दहा ते चौदा वर्षे
लेखिका – डॉ. वैशाली देशमुख
प्रकाशक – राजहंस प्रकाशन,
पृष्ठs – 155, मूल्य – 200 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या