
>> क्षितिज झारापकर
‘एक झुंज वाऱ्याशी’ कोणत्याही काळाशी सुसंगत ठरणारं पुलंचं नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरतंय.
हे वर्ष महाराष्ट्रीयन जन्मशताब्दी वर्ष म्हणून सगळ्यांच्याच लक्षात राहणार आहे. तब्बल तीन दिग्गजांच्या जन्मशताब्दी सध्या साजऱ्या होताहेत. गीत गजानन ग. दि. माडगुळकर, संगीत गजानन सुधीर फडके आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे या तिघांचे शंभरावे वाढदिवस साजरे होताहेत. गदिमांची गीतं आणि त्यावर बाबुजींची गाणी ही गायल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय त्यांचा आस्वाद घेणं शक्य नाही. गाणं ही शुद्ध कला असल्यामुळे ते कुणीतरी शास्त्रशुद्ध सादर केल्याशिवाय त्याचा प्रत्यय घेणं शक्य नाही. त्यासाठी संगीताचे असे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. पण पु. ल. देशपांडे ऊर्फ भाई हे मुळात लेखक, मग अभिनेते, संगीतकार वगैरे सगळं… म्हणून पुलंना अभिवादन करणं सामान्य माणसाला सहज शक्य आहे. कारण कुणीही कधीही त्यांची पुस्तकं वाचून ते करू शकतं. शिवाय पुलं अत्यंत लोकप्रिय. त्यामुळे आता वर्षभर गल्लीबोळातून पुलोत्सव होणार. उद्या शक्रवारी पुलंवरचा ‘भाई’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे आठवडय़ाभरापेक्षा मोठा पुलोत्सव साजरा करण्यात आला. त्यात या तीनही दिग्गजांना अभिवादन करण्यात आलं. हे तिघे समकालीन तर होतेच, पण या तिघांनी एकमेकांसोबत खूप कामदेखील केलं आणि मराठी संस्कृती समृद्ध केली. याच शासनाच्या सोहोळ्यात पु. ल. देशपांडे लिखित, खरं तर लिखित म्हणण्यापेक्षा भावानुवादित केलेलं ‘एक झुंज वाऱ्याशी’ हे दोन अंकी नाटक सादर केलं गेलं.
‘व्हिजन’ या संस्थेमार्फत ‘एक झुंज वाऱ्याशी’ सादर झालं. ‘व्हिजन’ आणि त्याचे सर्वेसर्वा श्रीनिवास नार्वेकर मराठी नाट्यसृष्टीमध्ये अनेक उपक्रम करतात. ‘एक झुंज वाऱ्याशी’ हा त्यांचा सध्याचा नवीन उपक्रम आहे. देशात आणीबाणी लादली गेली त्यावेळच्या परिस्थितीवर रिऍक्शन म्हणून पुलंनी ‘एक झुंज वाऱ्याशी’ हे नाटक मराठीत आणलं. व्हॅलादलीन दोझोर्त्सेव या रुसी लेखकाच्या ‘द लास्ट अपॉन्टमेन्ट’ या रशियन नाटकाचा हा भावनुवाद. रशियात कम्युनिस्ट राजवटीत जशी दडपशाही रुढ होती तशीच परिस्थिती आणीबाणीच्या काळात हिंदुस्थानात निर्माण झाली आणि मग हे नाटक पुलंना आपलंसं वाटू लागलं. त्यात त्यांना मराठी बोलणारी माणसं दिसायला लागली, असं पुलं नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या निमित्ताने बोलले होते. नाटकाचा गाभा हा सामान्य माणसाची जाब विचारण्याची इच्छा आणि शक्ती यावर बेतलेला आहे. एक माणूस आरोग्यमंत्र्यांच्या दालनात येतो आणि त्यांनी केलेल्या अन्यायाकरिता त्यांचा राजीनामा मागतो. हा अन्याय त्याच्यावर झालेलाच नाहीये. दुसऱ्याच कुणावर झालेला आहे, पण जाब हा सामान्य माणूस सर्व पुराव्यांनिशी मागतोय. सामान्य माणूस, आरोग्यमंत्री, मंत्र्यांचा स्वीय सचिव आणि अन्याय झालेल्याची बायको या पात्रांमध्ये ‘एक झुंज वाऱ्याशी’चं नाट्य उभं राहतं. पुलंनी येथे आपल्याला माणसांच्या स्वभावधर्माचं आणि सदसद्विवेकबुद्धीचं विस्तृत दर्शन घडवलं आहे.
‘व्हिजन’चं ‘एक झुंज वाऱ्याशी’ स्वतः श्रीनिवास नार्वेकरांनी दिग्दर्शित केलेलं आहे. नवीन मराठी रंगकर्मींसाठी आवाजाची कार्यशाळा नियमितपणे चालवणारे नार्वेकर हे थिएटरमधे पॉजचा वापर करण्याचे पुरस्कर्ते आहेत. पॉज खूप काही सांगून जातो असं ते प्रामणिकपणे मानतात. इथे मात्र त्यांना हे तंत्र फार वापरता आलेलं नाही. कदाचित पुलं हे उत्तम अभिनेते होते आणि म्हणून त्यांच्या सगळ्याच नाटकांमधले संवाद हे ते पात्र स्वाभाविकपणे काय आणि कसं बोलेल याचा विचार करून लिहिलेले असतात म्हणून असं झालं असेल. तरीही काही ठिकाणी नार्वेकरांनी पात्रांच्या योग्य मूव्हमेन्ट बांधून पॉझेस घडवलेत आणि उत्तम परिणाम साधलेला आहे. संपूर्ण नाटक आखीव रेखीव आणि बंदिस्त भासतं ही दिग्दर्शकाची जमेची बाजू आहे. बाबा पार्सेकरांनीही नेपथ्यातून ‘एक झुंज वाऱ्याशी’ची कलात्मकता वाढवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. नाटकाचं नेपथ्य हे सूचक असावं आणि ते कसं हे पार्सेकर येथे दाखवतात.
नार्वेकरांनी ‘एक झुंज वाऱ्याशी’मध्ये स्वतः सामान्य माणूस साकारला आहे. त्यांनी एक विशिष्ट ढब आणि देहबोली वापरली आहे. त्यामुळे हे पात्र आक्रमक वाटण्यापेक्षा उद्धट जास्त वाटतं. पण दिग्दर्शकाला बहुदा हेच अपेक्षित असावं. नार्वेकरांचा एकंदर वावर परिणामकारक आहे. आरोग्यमंत्र्यांच्या भूमिकेत दीपक करंजीकर आहेत. अर्थक्रांती संस्थेशी निगडित असलेले करंजीकर सध्या दिल्लीत एक समितीवरही नियुक्त आहेत. ते नाट्य परिषदेचे पदाधिकारीही होते. इतक्या पदांवरून संचार केल्यावर त्यांनी अनेक मंत्री खूप जवळून पाहिले असतील आणि म्हणून हे पात्र साकारणं त्यांना सोपं आहे असं आपल्याला वाटेल, पण इथेच पुलंनी या पात्राची गोची केली आहे. हा आरोग्यमंत्री समंजस आणि संवेदनशील आहे. आता असे मंत्री गेल्या तीस-चाळीस वर्षांत तरी करंजीकरांनी त्यांच्या कुठल्याही वास्तव्यात पाहिलेले असणं शक्य नाही, पण तरीही त्यांनी हे पात्र त्याच्या सर्व छटांसहित उत्तम सादर केलंय. यात दीपक करंजीकरांचं अभिनयकौशल्य दिसून येतं. मंत्र्यांच्या सचिवाचं पात्र आशुतोष घोरपडे यांनी कमालीच्या सहजतेने साकारलंय. घोरपडे काही काळ राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे सचिव होते. इथे त्यांनी त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा आणि त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग केला आहे. शोभना मयेकर यांनी चित्रा हे पात्र खूप उत्कटपणे उभारलं आहे. नवऱ्यावर झालेल्या अन्यायाबाबतची अगतिकता शोभना यांनी फार परिणामकरक पद्धतीने मांडली आहे. एकूणच ‘व्हिजन’चं ‘एक झुंज वाऱ्याशी’ हे नाटक पु. ल. देशपांडे यांना अभिवादन म्हणून एक अत्यंत चांगला आणि स्तुत्य प्रयत्न आहे हे नक्की.
- नाटक : एक झुंज वाऱ्याशी
- निर्मिती : व्हिजन, मुंबई
- निर्माती सूत्रधार : निशांत घाटगे
- लेखक : पु. ल. देशपांडे
- नेपथ्य : बाबा पार्सेकर
- प्रकाश योजना : सिद्धेश नांदलस्कर
- रंगभूषा : उतेश खंदारे
- ध्वनी संयोजन : सुनील पाथरे, सागर पवार, अभिलेष सरपडवळ
- निर्माते, दिग्दर्शक, पार्श्वसंगीत : श्रीनिवास नार्वेकर
- कलाकार : शोभना मयेकर, आशातोष घोरपडे, श्रीनिवास नार्वेकर, दीपक करंजीकर
- दर्जा : ***




























































