
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-20 क्रिकेट मालिका उद्यापासून सुरू होतेय. त्यातच ऑस्ट्रेलियात होणार टी-20 विश्वचषक जवळ आला आहे. या बाबी लक्षात ठेवून आयपीएलच्या सर्वच संघांनी अधिकाधिक हिंदुस्थानी क्रिकेटपटूंवर 15 व्या पर्वासाठी झालेल्या लिलावात 204 खेळाडूंवर 551 कोटी 70 लाख रुपयांची उधळण केली आहे. त्यामुळे अनेक हिंदुस्थानी युवा खेळाडू मालामाल झाले आहेत. पण आपल्याला मिळालेल्या पैशांची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. आपण आयपीएल केवळ दोन महिनेच खेळतो. पण वर्षातील उर्वरित 10 महिने आपण टीम इंडियासाठी योगदान देतो याचे भान ठेवा, अशा शब्दांत टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांने संघातील युवा खेळाडूंचे कान टोचले आहेत.
ईशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा, शाहरुख खान, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदरसह अनेक युवा क्रिकेटपटू या आयपीएल लिलावात मालामाल झाले आहेत. पण या पैशांची हवा आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीवर विपरीत परिणाम होऊ देणार नाही याकडे लक्ष द्या, असा सल्ला रोहितने टीम इंडियाच्या युवा क्रिकेटपटूंना दिला आहे. उद्या बुधवार 16 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडीज आणि हिंदुस्थान संघातील टी-20 लढतीची मालिका सुरू होत आहे आणि त्याआधीच लोकेश राहुल, अक्षर पटेल यांच्यापाठोपाठ वॉशिंग्टन सुंदर यानेही काल दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली.
आता सध्या आपले लक्ष्य फक्त ‘ब्ल्यू जर्सी’
आयपीएल आपण फक्त दोन महिने खेळतो आणि उर्वरित दहा महिने आपण देशासाठी खेळतो. त्यामुळे आता राष्ट्रीय कर्तव्यावर असताना आयपीएलचा विचार केला जाणार नाही. हिंदुस्थानी संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर लक्ष द्या. आयपीएल लिलावात बरेच चढउतार झाले हे मलाही समजतेय. काल आमची मीटिंग झाली आणि त्यात मी सर्वांना आता लक्ष्य ‘ब्ल्यू जर्सी’ असे सांगितले. अखेर हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तिथे दुसरा विचारच चालणार नाही, असे रोहितने हिंदुस्थानी संघातील आपल्या ज्युनियर आणि सीनियर सहकाऱयांना सुनावले.
मालिकेला सुरुवात होण्याआधी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने सर्व युवा खेळाडूंना भानावर आणले आहे. या पत्रकार परिषदेत रोहितला ईशान किशनबाबत विचारण्यात आले. मुंबई इंडियन्सने त्याला 15.25 कोटींत आपल्या ताफ्यात पुन्हा घेतले आहे.
‘आपल्याकडून जगभरातील क्रिकेटशौकिनांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यामुळे संघात जे बदल करावे लागतील ते करावेच लागणार. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडू निवडणे हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे या संघात कोणाची जागा पक्की आहे किंवा नाही हे मलाही आताच नाही माहीत. व्यग्र वेळापत्रक आहे आणि दुखापतीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी देण्याची गरज आहे.’
– रोहित शर्मा, कर्णधार टीम इंडिया




























































