रोखठोक – गांधी मरणार नाहीत! गुरुजींचे दु:ख समजून घ्या

सांगलीचे मनोहर भिडे हे आपले गुरुजी आहेत, असे श्री. देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांच्या गुरुजींनी गांधींपासून नेहरूंपर्यंत, साईबाबांपासून महात्मा फुलेंपर्यंत सगळय़ांची निंदा सुरू केली आहे. तणाव निर्माण करून दंगली भडकवण्याची ही ‘सुपारी’ आहे!

एखाद्या व्यक्तीचा खून करण्याने विचार मरत नाहीत, कागद अगर पुस्तक जाळल्यानेही विचार नाहीसा होत नाही याची प्रचीती ‘गांधी-चरित्रा’ने येते. देशात मोदींचे सरकार आल्यापासून गांधींचा खून रोज होत आहे, पण तरीही मोदी परदेशात जातात तेव्हा त्यांना कुठे ना कुठे तरी गांधी पुतळ्याचे उद्घाटन करावे लागते. गांधी विचाराने जग प्रभावित आहे. गांधींच्या गुजरातमध्ये मोदी सरकारने सरदार पटेल यांचा अतिउंच पुतळा उभा करून गांधी विचार कमी लेखण्याचा प्रयत्न केला, पण लोक गांधींना विसरायला तयार नाहीत. गांधींना मारणाऱ्या गोडसेची जयंती काही लोक हिंदू म्हणून साजरी करतात. ही विकृती आहे. गांधींच्या पुतळ्यांवर, फोटोंवर गोळ्या मारून गोडसेला श्रद्धांजली वाहिली जाते. तरीही गांधी मरत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात ‘मनोहर भिडे’ नामक व्यक्तीने गांधींवर गलिच्छ शब्दांत चिखलफेक केली त्याची चिंता का करावी? मनोहर भिडे यांनी गांधींचा बाप मुसलमान होता असे जाहीर केले. हे विकृतीचे टोक आहे. भिडे हे गुरुजी म्हणून त्यांच्या समर्थकांत ओळखले जातात. देश किंवा समाज घडविण्यात कोणतेही योगदान नसलेली ही माणसे. त्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष केलेले बरे. गांधीजींनी जेथे त्यांच्या खुन्यालाच माफ केले तेथे भिडे यांच्यासारख्यांची काय पत्रास! ‘मनोहर भिडे हे आमचे गुरुजी आहेत,’ असे श्री. देवेंद्र फडणवीस अभिमानाने सांगतात, पण या गुरुजींनी फक्त गांधीच नाही, तर असंख्य लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीचे साईबाबा व थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुलेंचादेखील गलिच्छ शब्दांत अपमान केला. त्यामुळे हे असले ‘गुरू’ त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरोत.

युनियन जॅकवाले

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले ही गोष्ट गांधी-निंदा चालविणाऱ्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना सहन होत नाही. हे सर्व लोक गांधींचा मत्सर करतात. गंमत अशी की, यापैकी बहुतेकांना अखंड हिंदू राष्ट्र हवे होते व पाकिस्तानची निर्मिती किंवा फाळणी गांधींमुळे झाली असा त्यांचा दावा आहे; पण या प्रखर विचारांचे हे लोक त्यांच्या क्रांतीचा झेंडा घेऊन स्वातंत्र्य लढय़ाच्या रणात कोठेच दिसत नव्हते. शनिवारवाडय़ावर ‘युनियन जॅक’ फडकवण्यात यांचे पूर्वज सक्रिय होते असे इतिहास सांगतो. यापैकी अनेक जण इंग्रजांचे एजंट म्हणून स्वातंत्र्य चळवळ नष्ट व्हावी म्हणून काम करीत होते व ‘चले जाव’ चळवळीस विरोध करून इंग्रजांना सहाय्यक ठरेल अशा जाहीर भूमिका घेतल्या गेल्या. त्या विचारांचे वाहक गांधी, नेहरूंची निंदा आजही करतात याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. गांधींनी आपल्या अहिंसात्मक चळवळीचा पहिला प्रयोग दक्षिण आफ्रिकेत केला. गांधी, नेहरू, बोस ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे होती. त्यातील गांधी-नेहरू हे दोघेही इंग्लंडमधून म्हणजे ज्या देशातल्या साम्राज्यशाहीचे जोखड झुगारून देण्याची भारताची धडपड चालू होती त्या देशातून उच्च शिक्षण संपादन करून भारतीय जनतेसमोर आले. गांधींजी आणि नेहरू दोघेही ब्रिटिश कायद्याचे बारिस्टर होते. त्यांनी इंग्लंडमध्ये वास्तव्य करून शिक्षण घेतले होते. इनर टेंपल या संस्थेमधून इंग्लंडचा कायदा, त्यांची मूल्ये व इंग्रज बादशहाचा ‘काळा डगला’ घेऊन ते भारतात आले होते. सुभाषचंद्र बोस तर इंग्रजांच्या भारतावरच्या पोलादी अमलाची जी चौकट होती त्यातील प्रशासकाचे म्हणजे ‘आयसीएस’चे शिक्षण घेऊन आले होते. अशा रीतीने ब्रिटिश सत्तेच्या ‘इनर टेंपल’मधून शिक्षण घेऊन आलेल्या या तिघांनीही पुढे तेच डगले घालून त्याच ब्रिटिश सत्तेला गाडून टाकण्यासाठी कबर खोदणाऱ्यांची भूमिका घेतली हा इतिहास गांधी, नेहरू, बोसांवर चिखल फेकणाऱ्यांना माहीत नाही. गांधी-नेहरूंवर चिखलफेक करणाऱयांचा न्यूनगंड असा की, इतकी तोलामोलाची माणसं ते निर्माण करू शकले नाहीत. गांधी, नेहरू, सरदार पटेल, नेताजी बोस, डा. आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी अशा योग्यतेची माणसं त्यांच्या परिवारात घडवता आली नाहीत. त्यांनी घडवले ते प्रदीप कुरुलकर. ही त्यांची खरी वेदना. त्या वेदनेतून गांधी ते नेहरू चिखलफेक सुरू आहे.

नेहरू-गांधी

श्रीमान भिडे यांच्यासारखे लोक म्हणतात, देश घडविण्यात नेहरू किंवा गांधींचे योगदान नाही. मग हा देश, देशाचे स्वातंत्र्य, त्यातील लढे हे सर्व कसले प्रतिबिंब आहे? मणिपुरात हिंसेचा आगडोंब उसळला आहे व त्यामागे चीनचा हात आहे. तरीही पंतप्रधान मोदी गप्प आहेत व गांधी-निंदा करणारे लोक मोदींच्या या थंड वृत्तीवर बोलायला तयार नाहीत. गांधींच्या तत्त्वांचा जगात उदो उदो सुरू असताना येथील मूठभर स्वकीय गांधी-निंदेत धन्यता मानतात. हा त्यांचा वैचारिक दरिद्रीपणा आहे. गांधींचे सगळेच विचार, भूमिका मान्य करायला हव्यात असे नाही, पण फडतूस लोकांनी गांधींची निंदा करावी व अशा निंदकांना राजाश्रय मिळावा याचे आश्चर्य वाटते. गांधींच्या अनेक भूमिका अनाकलनीय होत्या. नेहरू आपल्या आत्मचरित्रात लिहितात, “राजकीय प्रश्नाबाबतचा त्यांचा धार्मिक आणि भावनिक दृष्टिकोन आणि त्यासंबंधात त्यांनी वारंवार दिलेला देवाचा हवाला पाहून मला त्यांचा राग आला. एकदा तर त्यांच्या उपोषणाची तारीख देवाने निर्देशित केली असे त्यांनी सूचितही केले. किती विलक्षण मार्गदर्शन देण्याचा हा प्रयत्न?”

बंडखोर गांधी

जालियनवाला बाग हत्याकांडाने अहिंसक गांधी बंडखोर बनले. त्यांनी विधान केले की, ‘ब्रिटिश सरकार हे पापी सैतान आहे आणि या सैतानाचा नायनाट केलाच पाहिजे. सैतानाशी तडजोड करणे शक्य नसते.” या एका विधानाने कायदेभंग, असहकाराच्या चळवळीची वाटचाल सुरू झाली. ब्रिटिश साम्राज्याला धक्का बसला. देशातील शाळा, कालेज ओस पडली. कोर्टात बहिष्कार पडला. कित्येक नामवंतांनी सरकारी पदव्या, पुरस्कार परत केले, परदेशी कपड्यांची होळी सुरू झाली. हरताळ, संप करून लाखो लोक रस्त्यावर उतरले. गांधीजींनी जनतेच्या मनातली भीती नष्ट केली. त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्ते तळमळू लागले. रस्त्यावर पोलिसी हल्ल्याची पर्वा न करता ‘महात्मा गांधी की जय’च्या घोषणा देत लोक रस्त्यावर उतरले. या उठावात आजच्या राज्यकर्त्यांचे पूर्वज कोठेच नव्हते. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्य मिळवले. यामुळेच एका मत्सरातून ते गांधी-नेहरूंची निंदा करीत आहेत. त्याने काहीच साध्य होणार नाही.

महाराष्ट्रात पडसाद

दिल्लीत गांधींची हत्या झाली त्याचे सर्वाधिक पडसाद महाराष्ट्रात उमटले. कारण गांधींवर गोळय़ा झाडणारा गोडसे हा महाराष्ट्रातला होता. त्याच्या सर्वाधिक झळा ब्राह्मण वर्गास बसल्या. इंदिरा गांधींची हत्या एका शिखाने केली म्हणून शिखांवर निर्घृण हल्ले झाले, शिखांच्या कत्तली झाल्या. हे सर्वार्थाने चूक होते. त्या दंगलींच्या जखमा घेउढन शीख समाज आजही जगत आहे. शीख दंगलीचे व्रण आजही दिल्लीच्या शीख वस्त्यांत पाहायला मिळतात. गांधीहत्येनंतर महाराष्ट्रातही काहीसे तसेच घडले, पण त्यात महात्मा गांधींचा काय दोष? गांधींना नेतेपद जनतेने बहाल केले. स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अल्प आहे. वीर सावरकरांचा वाटा सोडला तर नाहीच असे म्हणावे लागेल. हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तर किनाऱयावरूनच अवलोकन करीत होते. या न्यूनगंडातून या संघटना व त्यांचे समर्थक बाहेर पडायला तयार नाहीत. श्री. मोदी यांनी दिल्लीत नवे संसद भवन उभारले. कारण जुन्या संसद भवनास क्रांती, स्वातंत्र्य चळवळ व गांधी-नेहरूंच्या विचारांचा वारसा आहे. ते ओझे यांना पेलवले जात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेतला नाही. 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी त्यांनी मध्य प्रांताच्या त्यावेळच्या इंग्रज राज्यपालास ‘संघ या चळवळीत भाग घेणार नाही,’ असे आश्वासन दिल्याच्या नोंदी आहेत. संघातील काही तरुणांनी 1942 च्या चळवळीत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी गोळवलकर गुरुजींनी त्यांना या शिस्तभंगाची शिक्षा काय दिली? तर त्यांना इंग्रजांच्या सैन्यात दाखल होण्याचा आदेश दिला. 1944 ला पुण्यात अरणेश्वर येथे भरलेल्या संघाच्या शिबिरात तर गोळवलकर गुरुजी यांनी 1942 च्या निर्णायक स्वातंत्र्य चळवळीची म्हणजे ‘चले जाव’ आंदोलनाची चेष्टाच केली. ते म्हणाले की, ‘एक वाऱ्याची झुळुक आली, दोन-चार झाडे पडली यापेक्षा 1942 मध्ये काही घडले नाही.’ पण याच आंदोलनाने गांधींनी ब्रिटिश साम्राज्याच्या कंबरड्यात लाथ घातली. ते मोडके कंबरडे घेउढन ब्रिटिशांनी देश सोडला. हे गांधींचे योगदान आहेच. गांधींचा बाप काढणाऱ्यांची ही वेदना समजून घेतली पाहिजे. अल्बर्ट आइन्स्टाईनने महात्मा गांधींविषयी उच्चारलेले एक वाक्य मला आठवते. ते म्हणाले होते, “येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की, खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता.”

गांधी निंदकांची पोटदुखी यात आहे!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]