
पदोन्नतीसह इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याच्या हेतूने सोमवारी आणि मंगळवारी राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये दोन तास ठिय्या आंदोलन करून संतप्त भावना व्यक्त केल्या जाणार आहेत. आरटीओ कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी रविवारी हा पवित्रा जाहीर केला.
आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे झाली तरी सेवाप्रवेश नियम तयार नाहीत. परिणामी, कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित असल्याचे म्हणणे मांडत आरटीओ कर्मचाऱ्यांनी संपाचे शस्त्र उपसले आहे. हा बेमुदत संप पुकारल्यानंतरही सरकार किंवा प्रशासनाने तोडगा काढलेला नाही. त्या नाराजीतून कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. मागील सात दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संघटना विस्तारित कार्यकारिणीची सभा पार पडली. सभेत आतापर्यंतची संप स्थिती, कर्मचाऱ्यांचा मिळालेला उदंड प्रतिसाद व प्रशासनाची नकारात्मक चाल याविषयी सखोल चर्चा करून आंदोलनाची धार तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवार आणि मंगळवारी संपूर्ण राज्यात सकाळच्या सत्रात बेमुदत संप आंदोलनासह सर्व कार्यालयांमध्ये दोन तास ठिय्या आंदोलन केले जाईल. याची दखल जर सरकारने घेतली नाही तर बुधवारपासून राज्यातील सर्व कार्यालयांसमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्धार एकमताने केल्याचे सुरेंद्र सरतापे यांनी स्पष्ट केले.



























































